जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यातील जंगलात पाकिस्तान-स्थित जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनेच्या तीन दहशतवाद्यांच्या शोधासाठी शनिवारी तिसऱ्या दिवशीही सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकांद्वारे मोहीम सुरूच राहिली. शनिवारी हवाई गस्त वाढवण्यात आल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.
'जैश'चा एक दहशतवादी बिहाईमधील करूर नाला येथे गुरुवारी सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत मारला गेला होता, तर त्याचे तीन साथीदार बसंतगढच्या जंगलात पळून गेले होते. सुरक्षा दलांनी या परिसराला बहुस्तरीय वेढा घातला असून संयुक्त कृती दलांच्या साह्याने व्यापक शोधमोहीम शनिवारी सकाळी पुन्हा सुरू करण्यात आली. या मोहिमेसाठी ड्रोन, तसेच श्वानपथकाचेही साह्य घेण्यात येत आहे. हा वेढा अतिरिक्त मनुष्यबळाच्या मदतीने आणखी घट्ट करण्यात आला आहे.
अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली असून, जम्मू-पठाणकोट महामार्गावर वाहनांची तपासणी सुरू आहे.
दहशतवादी अद्याप वेढा घातलेल्या भागातच असल्याचे पोलिस महानिरीक्षक भीम सेन तुती यांनी सांगितले. चार दहशतवाद्यांपैकी या गटाच्या कमांडरला कंठस्नान घालण्यात आले, असे त्यांनी सांगितले. हैदर उर्फ जब्बार उर्फ मौलवी असे त्याचे नाव असून तो पाकिस्तानी होता, अशी माहिती समोर आली आहे. या दहशतवादी गटाचा माग काढण्याचे काम मागील एक वर्षाहून अधिक काळापासून सुरू आहे. या गटातील जैश-ए-मोहम्मदशी संबंधित असलेल्या दोन दहशतवाद्यांना मागील वर्षी सप्टेंबरमध्ये मारण्यात आले होते.
महाराष्ट्र टाईम्स २९/६/२५