उत्तराखंड सरकारने एक महत्त्वपूर्ण आदेश प्रसारित केला. त्यानुसार राज्यातील सर्व शासकीय शाळांमध्ये प्रतिदिन सकाळच्या प्रार्थनासभेत भगवद्गीतेतील एका श्लोकाचे पठण करून त्याचा अर्थ सांगणे अनिवार्य करण्यात आले आहे. राज्यांत १७ हजार शासकीय शाळा आहेत.या आदेशात स्पष्ट निर्देश दिले आहेत की, शिक्षकांनी केवळ श्लोकपठण करू नये, तर त्याचा सार्थक अर्थ, वैज्ञानिक संदर्भ आणि नैतिक शिक्षण, हे विद्यार्थ्यांना समजावून सांगावे. प्रत्येक आठवड्यात एक श्लोक ‘सप्ताहाचा श्लोक’ म्हणून निवडण्यात येईल, तो शाळेच्या सूचना फलकावर लिहिण्यात येईल आणि आठवड्याच्या शेवटी ‘त्या श्लोकाचा विद्यार्थ्यांच्या मनावर काय परिणाम झाला ?’, यावर चर्चा घेऊन अभिप्राय घेणे अनिवार्य असेल. या निर्णयाविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले की, यामुळे मुलांमध्ये कर्तव्यनिष्ठा, नेतृत्वगुण आणि भावनिक संतुलन, हे गुण विकसित होतील.
उत्तराखंडमधील मदरशांमध्येही भगवद्गीतेच्या श्लोकांचे पठण केले जाणार आहे. राज्याच्या ‘मदरसा शिक्षण परिषदे’चे अध्यक्ष शमून कासमी यांनी याची घोषणा केली आहे. त्यांनी शाळांमध्ये भगवद्गीतेच्या श्लोकांचे पठण चालू करण्याच्या मुख्यमंत्री धामी सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले.
कासमी यांच्या मते, काही निवडक मदरशांमध्ये संस्कृत भाषा शिकवण्यास प्रारंभ केला जाईल आणि नंतर हळूहळू हे सर्व मदरशांमध्ये संस्कृत शिकवले जाईल. त्यांनी म्हटले की, भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाचा उपदेश आहे. शाळांमध्ये गीतेचे पठण झाल्यास सामाजिक समरसता प्रस्थापित होईल; म्हणूनच मदरशांमध्येही हे लागू करण्यात येईल.
सनातन प्रभात १७/७/२५