
शिवछत्रपतींनी रायरेश्वर (ता. भोर) येथे (एप्रिल १६४५) सवंगड्यांसह स्वराज्यस्थापनेची शपथ घेतल्याचे इतिहास सांगतो. या घटनेला तीनशे वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त त्याच्या स्मृती जपण्यासाठी (स्वराज्यस्थापना प्रतिज्ञेचा त्रिशत्सांवत्सरिक उत्सव) हा स्मारकस्तंभ भोरचे अधिपती श्रीमंत राजे सर रघुनाथराव पंडित पंतसचिव यांनी १९४५ मध्ये उभारला. आज हे स्मारकशिल्प उपेक्षित असून, राजगड-तोरण्याकडे जाणाऱ्या इतिहासप्रेमींनीही त्याकडे पाठ फिरवली आहे.
पुणे-बंगळुरू महामार्गावर चेलाडीहून (नसरापूर फाटा, पुण्याहून सुमारे ३८ किलोमीटर) आपण उजवीकडे वळतो. तेथून डावीकडे असलेल्या शाळेजवळ कुंपण घातलेल्या प्रांगणात हे दगडी स्मारक आहे. सभोवतालच्या अतिक्रमणांमुळे तो पटकन लक्षात येत नाही. मात्र, जवळ गेल्यानंतर त्याची सुघड बांधणी आपल्याला इतिहासाचे स्मरण करून देते. ब्रिटिश राजवटीत एका संस्थानिकाने केलेली स्वराज्यस्मारकाची उभारणी ही घटना त्या काळातील दुर्मीळ आणि धाडसी निर्णय म्हणून पाहिली जाते.
दगडी चौथऱ्यावर खाली चौरस, मग अष्टकोनी आणि वर गोलाकार अशी या स्तंभाची रचना आहे. भोर संस्थानात असणाऱ्या गडांची नावे आणि त्यांची मैलांत असलेली अंतरे गडांच्या दिशेला संगमरवरी पट्टीवर कोरलेली आहेत. शिवछत्रपतींनी स्वराज्यस्थापनेची शपथ घेतल्याचा प्रसंग आणि त्याची मुद्राही संमरवरात कोरून या स्तंभावर लावण्यात आली आहे. एका बाजूस ढाल-तलावर आणि धनुष्यबाण ही शस्त्रेहीं दिसतात. उत्तरेस सुधागड ४१ मैल, सिंहगड साडेअकरा मैल, तुंग ३९ मैल, तिकोना ३८ मैल, आग्नेयेस पुरंदर ६ मैल, नैऋत्येस आंबाडखिंड १६ मैल, भोर आठ मैल, रोहिडा १२
मैल, आंबवडे साडेचौदा मैल, रायरेश्वर साडेअठरा मैल, तर पश्चिमेस राजगड साडेतेरा मैल आणि तोरणा १९ मैल अशी माहिती संगमरवरी पट्ट्यांवर काळ्या रंगात कोरलेली आहे. मात्र, निगा न राखल्याने त्याची आज दुरवस्था झाली आहे.
हा स्तंभ या ठिकाणी उभारण्यामागे असणाऱ्या आख्यायिकेबाबत रांझे, खेड शिवापूर येथील वारसा अभ्यासक उमेश उल्हाळकर म्हणाले, 'स्वराज्यस्थापनेवेळी तोरणागड घेण्याचे नियोजन या ठिकाणी झाल्याचे सांगतात. या स्तंभावर भवानीमातेच्या पूजेचा प्रसंग कोरला आहे. त्याखाली त्याची माहिती दिलेली आहे. दुसऱ्या बाजूस हाच मजकूर इंग्रजीत आहे. हा स्तंभतीस फूट उंचीचा आहे. ब्रिटिश राजवटीत एखाद्या संस्थानिकाने अशा स्वरूपाचे स्मारक उभारणे आणि शिवराय हेच आमची प्रेरणा आहेत, हे दाखवणे धाडसाचे होते. या स्मारकाची निगा राखणे आवश्यक आहे.'
महाराष्ट्र टाइम्स १७/७/२५