आपण विकासासाठी बांधलेली हजारो धरणं पृथ्वीच्या मुळावरच घाव घालत आहेत की काय, अशी शंका निर्माण करणारा एक नवीन अभ्यास समोर आला आहे. १८३५ पासून जगभरात बांधलेल्या हजारो धरणांमध्ये साठवलेल्या प्रचंड जलसाठ्यामुळे पृथ्वीचे ध्रुव आपल्या जागेवरून सरकले आहेत, असा धक्कादायक निष्कर्ष एका नव्या संशोधनातून काढण्यात आला आहे. शास्त्रज्ञांच्या मते, मोठी धरणं इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी साठवून ठेवतात की त्यामुळे पृथ्वीवरील वस्तुमानाचे वितरण बदलते. यामुळे पृथ्वीचे कवच तिच्या मधल्या थरावर, म्हणजेच मॅन्टलवर घसरते. पृथ्वीचा मॅन्टल हा अर्थ-प्रवाही असून त्यावर असलेले पृथ्वीचे कवच या वजनामुळे आपली जागा बदलते. कवचाच्या या बदलामुळे पृथ्वीच्या ध्रुवांच्या स्थितीतही बदल होतो. या प्रक्रियेला शास्त्रज्ञांनी 'टू पोलर वॉन्डर' असे म्हटले आहे. हा अभ्यास 'जिओफिजिकल रिसर्च लेटर्स' या प्रतिष्ठित जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे.
मानवी कृतींमुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याचे स्थलांतर होऊन ध्रुवीय बदल होऊ शकतो, हे शास्त्रज्ञांना आधीपासूनच माहीत होते. हवामान बदलामुळे वितळणाऱ्या बर्फामुळे या शतकाच्या अखेरीस पृथ्वीचे ध्रुव तब्बल ९० फुटांपर्यंत (२७ मीटर) सरकू शकतात, असे एका अभ्यासात म्हटले आहे, तर २०२३ च्या एका अभ्यासानुसार, १९९३ ते २०१० या काळात भूगर्भातील पाण्याच्या प्रचंड उपशामुळे पृथ्वीचे ध्रुव ३१ इंच (८० सेंटिमीटर) सरकल्याचे दिसून आले होते.
या नवीन अभ्यासासाठी, संशोधकांनी १८३५ ते २०११ दरम्यान जगभरात बांधलेल्या ६,८५२ धरणांच्या परिणामांचा अभ्यास केला. या धरणांमध्ये साठवलेले पाणी अमेरिकेतील 'ग्रँड कॅनियन' दरी दोनदा भरेल इतके प्रचंड आहे. या पाण्यामुळे जागतिक समुद्र पातळीत ०.९ इंच (२३ मिलिमीटर) घट झाली होती, हे आधीच सिद्ध झाले आहे. आता नव्या संशोधनातून असे दिसून आले आहे की, याच पाण्याच्या वजनामुळे पृथ्वीचे ध्रुव अभ्यासाच्या कालावधीत एकूण ३.७ फूट (१.१ मीटर) इतके सरकले आहेत.
पुढारी १४/७/२५