९६ वर्षीय कर्नाटकच्या भीमव्वा यांना 'पद्मश्री' पुरस्कार प्राप्त

07 Jun 2025 17:30:00

 
sanskrutik vartapatra mahila_18

‘कठपुतळी’ या कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल ९६ वर्षीय भीमव्वा शिल्लेक्यतारा यांना नुकतंच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं . राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सोमवार दिनांक २८ एप्रिल २०२५ रोजी त्यांना पुरस्कार देण्यात आला.

कर्नाटकातील काही प्रांतात ‘तोगलू गोम्बेआटा’ ही कठपुतळ्याच्या कलेची परंपरा आहे. गोम्बे म्हणजे बाहुली आणि आटा म्हणजे खेळ. या खेळातील बाहुल्या या चामड्यापासून बनवलेल्या असतात. भीमव्वा यांनी वयाच्या १४ व्या वर्षापासून चामड्याच्या बाहुल्या तयार करण्यास सुरुवात केली. अगदी लहानपणापासून त्यांनी कौटुंबिक व्यवसायात हातभार लावला. त्यांनी कुरुक्षेत्र आणि द्रौपदी वस्त्रहरणासह महाभारतातील १८ भागांचे वर्णन करणाऱ्या गुंतागुंतीच्या बाहुल्या तयार केल्या आहेत. कलाक्षेत्राकरता त्यांचं हे खूप मोठं योगदान आहे. त्यांनी २०० वर्षं जुन्या बाहुल्यांचही जतन करत आपली पारंपारिक कला जोपासली आहे. त्यामुळे भीमव्वा यांना पारंपरिक कलेच्या वाहकच म्हणावे लागेल.

कर्नाटकातल्या कोप्पल जिल्ह्यातील मोरनाल गावामध्ये १९२९ साली भीमव्वा यांचा जन्म झाला. बाहुल्या तयार करण्याचा कौटुंबिक व्यवसाय असल्यामुळे त्या बालपणापासूनच या सगळ्या गोष्टी पाहत होत्या. या कलेविषयी त्यांनी कोणतेही औपचारिक शिक्षण घेतले नाही. आपल्या वडिलांकडूनच त्या ही कला शिकल्या. रामायण आणि महाभारतासारख्या प्राचीन महाकाव्यांतली गोष्टी त्यातले पात्र त्यांनी आपल्या या चामड्याच्या कठपुतळ्यातून जिवंत केले. या त्यांच्या कलेमुळे त्या नावारूपास आल्या. चामड्यापासून बनवलेल्या कठपुतळ्यांच्या माध्यमातून रामायण आणि महाभारतातील प्रसंग मनमोहकरूपात सादरीकरण केल्याने त्यांना विशेष ओळख मिळाली.

अमेरिका, फ्रान्स आणि इटली सारख्या देशांमध्ये सादरीकरणाद्वारे त्यांच्या कलेला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. या कलेच्या माध्यमातून त्या भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा जगासमोर मांडतात.

भीमव्वा यांच्या कलेचा वारसा त्यांचा ७५ वर्षाचा मुलगा केशप्पा पुढे चालवत आहे.ते देखील एक प्रसिद्ध कठपुतळी कलाकार आणि विविध पुरस्कार विजेते आहेत.

पद्मश्री पुरस्कारासह भीमव्वा यांना अनेक पुरस्काराने गौरविलं आहे. यात तेहरान कंट्री पपेट फेस्टिव्हल अवॉर्ड (१९९३ ), संगीत नाटक अकादमी अवॉर्ड (२०१०), राज्योत्सव अवॉर्ड (२०१४) आणि जनपद श्री अवॉर्ड (२०२०-२१) यासारख्या उल्लेखनीय पुरस्कारांसह पारंपारिक कठपुतळी कला क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल घेतली आहे.

श्रेष्ठ मराठी ३०.४.२५

Powered By Sangraha 9.0