पिलीभीत जिल्ह्यातील भारत-नेपाळ सीमेला लागून असलेल्या गावांमध्ये विश्व हिंदु परिषदेच्या एका कार्यक्रमात अनुमाने ५०० शिखांनी घरवापसी केली. हे लोक पूर्वी शीख धर्म सोडून ख्रिस्ती बनले होते. बेल्हा आणि ततारगंज गावांमध्ये झालेल्या समारंभात शीख समुदायातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विहिंपने या गावांमध्ये २ दिवस शिबिरे आयोजित केली आणि लोकांना शीख धर्मात परत आणण्यासाठी जागरूकता मोहीम राबवली. या वेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.
१. विहिंपचे संघटन मंत्री प्रिन्स गौर म्हणाले की, नेपाळ सीमेला लागून असलेल्या गावांमध्ये लोकांना भेटण्यात आले आणि त्यांना शीख धर्माचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. अनेक कुटुंबांनी स्वेच्छेने घरी परतण्याचा निर्णय घेतला. गुरुद्वारा व्यवस्थापन समितीने ‘अमृतपान’सारख्या धार्मिक कार्यक्रमांद्वारे १६० कुटुंबांना शीख धर्मात परत आणले आहे. त्याच वेळी, इतरांना धर्मांतर करण्यास प्रवृत्त करणार्या काही लोकांवरही सामाजिक बहिष्कार टाकण्यात आला.
२. पिलिभीतच्या बेल्हा, ततारगंज, बामनपुरी आणि सिंघारा या गावांमध्ये धर्मांतराच्या तक्रारी बर्याच काळापासून येत होत्या. स्थानिक शीख संघटनांचा दावा आहे की, नेपाळमधील पाद्री आणि काही स्थानिक पाद्री यांना आर्थिक प्रलोभने आणि उपचार सत्रे यांद्वारे शिखांना ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यास प्रोत्साहित केले.
३. अखिल भारतीय शीख पंजाबी कल्याण परिषदेच्या मते, गेल्या काही वर्षांत ३ सहस्रांहून अधिक शिखांनी धर्मांतर केले आहे. यापैकी १६० कुटुंबांची सूची प्रशासनाकडे सुपुर्द करण्यात आली.
४. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन नवनियुक्त जिल्हाधिकारी ज्ञानेंद्र कुमार सिंह यांनी धर्मांतराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी विशेष अन्वेषण पथक (एस्.आय.टी.) स्थापन केले आहे. मनजीत कौर या शीख महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी ८ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या ८ जणांच्या विरोधता मनजीत कौर यांना धर्मांतर करण्यास भाग पाडल्याचा आणि त्यांच्या शेतांची हानी केल्याचा आरोप आहे. मनजीतने सांगितले की, तिच्या पतीने आधीच ख्रिस्ती धर्म स्वीकारला होता आणि आता तिच्यावर आणि तिच्या मुलांवरही धर्मांतर करण्यासाठी दबाव आणला जात आहे.
सनातन प्रभात २६/५/२५