सिंधुदुर्गात सागरी जीव संवर्धन अन् पर्यटनाला चालना

16 Jun 2025 10:30:00
 
sanskrutik vartapatra anya_55 (1)
 
'आयएनएस गुलदार' या नौदलातून सेवानिवृत्त झालेल्या युद्धनौकेचे गुलदारचे पाण्याखालील संग्रहालय आणि जहाजाभोवती कृत्रिम प्रवाळ निर्माण करण्यात येणार आहे. भविष्यात पाणबुडीद्वारे पर्यटकांना या प्रवाळ आणि जहाजाची सफर करण्याचे नियोजित करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील निवती रॉकजवळ हा प्रकल्प होणार असून याचा शुभारंभ दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला.

या जहाजाचे वजन १ हजार, १२० टन आहे, तर लांबी ८३.९ मीटर असून रुंदी ९.७ मीटर आहे. ५.२ मीटर इतकी खोली आहे. हे जहाज दि. १२ जानेवारी २०२४ रोजी सेवानिवृत्त झाले आहे. केंद्र शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण पर्यटनस्थळांचा विकास करणे या योजनेंतर्गत 'स्पेशल असिस्टंट्स टू स्टेटस फॉर कॅपिटल इन्व्हेस्टमेंट' अंतर्गत या प्रकल्पास केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने दि. २७ डिसेंबर २०२४ रोजी मान्यता दिली आहे. भारतीय नौदलाने हे निवृत्त जहाज पोर्टब्लेअर, अंदमान येथून कारवार नेव्हल बेस, कर्नाटक या ठिकाणी स्वखर्चाने पोहोच करण्याची 'महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळा'ची विनंती मान्य केली असून यामुळे राज्य शासनाची आर्थिक बचत झाली आहे.

भारतातील हा पहिलाच उपक्रम असून यामुळे सागरी जीव संवर्धन आणि पर्यटनाला चालना मिळणार आहे. केंद्र शासनाने ऐतिहासिक पाऊल उचलत भारतीय नौदलाचे निवृत्त जहाज 'आयएनएस गुलदार' हे 'महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळा' कडे सुपूर्द केले आहे. जगातील अनेक देशात असे प्रकल्प तयार केले आहेत. हा प्रकल्प तयार करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या मान्यतेने भारतीय नौदलाने निवृत्त युद्धनौका 'महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळा' स विनामोबदला उपलब्ध करून दिली आहे.


मुं.त.भा १२/६/१५
Powered By Sangraha 9.0