संघाला नावं ठेवणारा मी, संघ प्रचारक झालो ! - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

08 May 2025 14:30:44

Sanskrutk Vartapatra_RSS_6.jpg
मी एका सामान्य कुटुंबात लहानाचा मोठा झालो. घरी काँग्रेसचे वातावरण असल्यामुळे लहानपणापासून संघाच्या विरोधातच ऐकले. त्यामुळे तसेच मत बनले होते. अकरावी-बारावीत शिकत असताना अनेकवेळा संघाच्या विरोधात जाहीर मत मांडले पण असे करूनही कुठल्याही संघ स्वयंसेवकांनी मला दूर केलं नाही. कॉलेजमधील संघ स्वयंसेवक असलेल्या मित्रांनी माझ्याशी चांगली मैत्री केली. माझे भाग्य असे की, योग्य वयात मला प्रचारकांचा सहवास लाभला. सर्वच प्रचारक मंडळींनी मला प्रवासात एक-एक गोष्ट शिकवली. अनोळखी गावात मुक्काम करताना काय काळजी घ्यायची, नवीन शाखेत खेळ, गोष्टी, चर्चा कशी घ्यायची हे सर्व सहज सोबत राहून शिकवले. पुढे पदवीचं शिक्षण सुरू असताना सहली, शिबिरं यात सहभागी होत गेलो. हळूहळू सर्व गैरसमज दूर होत गेले. प्राथमिक वर्ग, प्रथम संघ शिक्षा वर्ग, द्वितीय संघ शिक्षा वर्ग पूर्ण केले. या तीन वर्षात सर्वच बदलले. माझ्या व्यक्तिमत्वात खूप बदल झाला ज्याकरिता संघातील अनेक कार्यकर्त्यांचे विचार कारणीभूत ठरले.
आम्ही वर्षभर सलग मासिक निवासी वर्ग घेत होतो. त्यामुळे शाखेतील टोळीचे प्रशिक्षण करता करता आमचेही प्रशिक्षण होत गेले. शारीरिक, बौद्धिक, व्यवस्था कौशल्य सहज विकसित होत गेले. पदवीनंतरचे शिक्षण अंबेजोगाईला घ्यावे आणि संघ रचनेत विद्यार्थी विस्तारक राहून 'एम.एस.डब्ल्यू' चे शिक्षण पूर्ण करावे असे विभाग प्रचारकांनी सुचवले. एम.एस.डब्ल्यू करत असताना अंबेजोगाईला अनेक पुस्तके वाचण्याची,गीते पाठ करण्याची सवय लागली. अंबेजोगाईच्या सर्वच कार्यकर्त्यांनी कधीच घरची आठवण येवू दिली नाही. प्रत्येक सण उत्सव घरी असल्यासारखाच साजरा केला. यामुळेच पुढे सलग सहा वर्षं प्रचारक राहता आले. या सहा वर्षांच्या काळात अनेक ज्येष्ठ प्रचारकांचा सहवास, अनेक प्रशिक्षण वर्ग झाले त्यात असंख्य गोष्टी मनावर कोरल्या गेल्या. सर्वात महत्त्वाची गोष्ट शिकता आली ती म्हणजे अनोळखी व्यक्तींना आपलेसे कसे करायचे, कॉलेज तरुणांसोबत कसा संवाद करायचा हे सहज शिकत गेलो. प्रत्येक संघ शिक्षा वर्गात या कुटुंबाचा विस्तार देशभर पसरला होता. आता भारतभर सगळीकडे चांगले मित्र झाले आहेत. अनेकांचे समर्पित जीवन जवळून पाहिलेले असल्याने त्यापुढे आपण दिलेला वेळ म्हणजे काहीच नाही हेही लक्षात आले. पाय कायम जमिनीवर राहायला हवेत हे शिकता आले. जर माझ्या आयुष्यात संघ नसता तर हे कधीच घडू शकलं नसतं.

जितेंद्र खंडाळीकर, पिंपरी चिंचवड 
Powered By Sangraha 9.0