कुठलीही 'स्त्री' ही 'शक्ती स्वरूप' असते, असं आपली भारतीय संस्कृती सांगते. हेच ओळखून मुलींना देखील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत व पर्यायाने सैन्य दलामध्ये प्रवेश देण्याचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाने २०२१ मध्ये दिलेल्या अंतरिम आदेशामुळे मोकळा झाला होता. या ऐतिहासिक प्रवासात सहभागी झालेल्या कॅडेट्सनी त्यांचा आत्मविश्वास, जिद्द आणि देशाप्रती असलेली बांधिलकी दैनिक 'पुढारी'शी बोलताना व्यक्त केली.
एनडीएत जून २०२२ मध्ये मुलींची पहिली बॅच प्रविष्ट झाली. एनडीचे वातावरण पाहून या मुली भारवल्या. शिस्त, अनुशासन आणि सहकाऱ्यांचे मार्गदर्शन यामुळे पहिल्याच बॅचमधून उत्तीर्ण होणाऱ्या या कॅडेट्ससाठी हा क्षण अत्यंत गौरवाचा आहे. तीन वर्षांच्या कठोर प्रशिक्षणात त्यांनी केवळ शारीरिक आणि मानसिक क्षमता विकसित केल्या नाहीत, तर एक मजबूत नेतृत्वशील व्यक्तिमत्व देखील त्यांनी निर्माण केलं आहे.
लहानपणापासूनच सैन्यात जायचं ठरवलं होतं. वडिलांनीही एनडीएमधून पदवी घेतली होती. आज भी त्याच पायवाटेने जात आहे. ही माझ्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. दिवसाच्या प्रत्येक क्षणाचा उपयोग कसा करावा, हे इथे शिकायला मिळतं.
कॅडेट श्रुती दक्ष
एनडीएमध्ये दाखल होण्यापूर्वी अभियांत्रिकीचे पहिले वर्ष पूर्ण करणारी बटालियन कॅडेट कॅप्टन ऋतुल ही हवाई दलाची कॅडेट आहे. ती म्हणाली, एनडीएतील प्रशिक्षण कठीण असेल याचा अंदाज होता. त्यामुळे शारीरिक आणि भावनिकरष्ट्या आम्ही सक्षम होऊ हा देखील विश्वास होता. येथे आल्यावर त्याचीच प्रचिती आली. येथील व्यवस्था पाहून मी भारावून गेले एनडीएत आम्ही केवळ आमचं प्रशिक्षण पूर्ण करत नाही, तर पुढील पिढीसाठी एक आदर्श निर्माण करत आहोत.
ऋतुल दुहान, फर्स्ट बटालियन कॅडेट कॅप्टन
पुढारी २७.५.२५