सौदी अरेबियाने जानेवारी २०२४ पासून आतापर्यंत जवळपास ५०३३ पाकिस्तानी भिकाऱ्यांना मायदेशी परत पाठवल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानी गृहमंत्री मोहसीन नक्वी यांनी पाकच्या 'नॅशनल असेंब्ली'त ही माहिती दिली. याशिवाय अन्य देशांनीही पाकच्या भिकाऱ्यांना परत पाठवल्याचे त्यांनी सांगितले, नक्वी यांनी दिलेल्या माहितीनुसार २०२४ मध्ये इराक, मलेशिया, ओमान, कतार आणि संयुक्त अरब अमिरात या देशांनी एकूण चार हजार ८५० पाकिस्तानी भिकाऱ्यांना परत पाठवले.
सुमारे दोन कोटी भिकारी
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मुहम्मद आसिफ यांनी सांगितले, की पाकमध्ये सुमारे दोन कोटी दोन लाख लोक भिकेवर उपजीविका करतात. त्यांच्या वाढत्या संख्येमुळे परदेशात देशाची प्रतिमा खूप खराब होते. पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव झुल्फिकार हैदर म्हणाले, की परदेशात अटक झालेल्या भिकाऱ्यांपैकी तब्बल ९० टक्के नागरिक पाकचे आहेत.
प्रांतनिहाय भिकारी
भीक मागण्यासाठी विदेशात जाणाऱ्यांत सर्वाधिक लोक सिंध प्रांतातील आहे. एकट्या सौदी अरेबियात सिंधमधून दोन हजार ४८२ भिकारी गेले आहेत. पंजाबमधून एक हजार ९८, खैबर पख्तुनख्वामधून ८१९, बलुचिस्तानातून ११७ जण भीक मागण्यासाठी परदेशात गेले होते. ही संख्या फक्त परत पाठविलेल्यांची आहे.
कायदेशीर-प्रशासकीय आव्हाने
या संकटामुळे पाकिस्तान सरकारने विरोधी कडक कायदे केले आहेत. आतापर्यंत लाखो भिकाऱ्यांच्या पारपत्रावर (पासपोर्ट) निर्बंध अन् विदेश प्रवासावर बंदी घालण्यात आल्या आहेत. देशातील गरिबी आणि असमानता वाढली असून, रोजगार आणि सामाजिक सुरक्षा योजनांवरही परिणाम होण्याची भीती आहे.
सामाजिक-आर्थिक दुष्परिणाम
भिकाऱ्यांचे परदेशी निर्वासन झाल्याने पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय प्रतिमा मलिन झाली आहे. आखाती देशांसह अनेक राष्ट्रांनी पाकिस्तानी 'व्हिसां 'वर अनेक निर्बंध घातले आहेत. या भिकाऱ्यांचा एकूण वार्षिक महसूल अंदाजे ४२ अब्ज पाकिस्तानी रुपये असल्याची माहिती आहे. हे उत्पन्न या देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) १२ टक्के इतके आहे.
मुख्य कारणे
गरिबी व बेरोजगारी :
पाकिस्तानात रोजगाराच्या अनिश्चिततेमुळे अनेक गरीब नागरिक भीक मागणे हेच उपजीविकेचे साधन बनवतात.
मानवी तस्करी : पाकिस्तानातून भिकाऱ्यांना परदेशात पाठवणाऱ्या गुंडांचे संघटित गट सक्रिय आहेत.
फसवणूक-छळ :
तस्करीच्या जाळ्यांत अडकलेल्यांची फसवणूक, जबरदस्ती आणि छळाचा समावेश होतो.
पर्यटन व्हिसा गैरवापर :
अनेक भिकारी सौदी, इराण, इराक आदी राष्ट्रांकडून तीर्थयात्रेसाठी दिल्या जाणाऱ्या 'व्हिसा'चा गैरवापर करून जातात, तिथे पोहोचल्यावर भीक मागणे सुरू करतात. विशेषतः रमजानच्या महिन्यात परदेशात भिकाऱ्यांची संख्या वाढते, कारण त्या काळात धर्मिक ठिकाणी जास्त दान-रक्कम मिळू शकते.
बऱ्याच महिलांना व मुलांना बळजबरीने भीक मागण्याच्या कामात लावले जाते; त्यांची कागदपत्र जप्त केली जातात अन् भीक मागण्यासाठी धमकावले जाते. मारहाण होते.
सकाळ १९/५/२५