कुक्कुटपालन सल्ला- भाग २
कोंबड्यांना द्या पोषक आहार ताणामुळे चयापचय आणि पचन संस्था बिघडल्याने शारीरिक वाढीकरिता आवश्यक जीवनसत्वे व खनिजे उत्सर्जन प्रक्रियेद्वारे बाहेर टाकले जातात. त्याकरिता, कोंबड्यांच्या खाद्यात अतिरिक्त जीवनसत्वे व खनिजे, औषधी वनस्पती (आवळा, लिंबू, अश्वगंधा, तुळस, शतावरी) पुरवावीत.
खाद्यात ५ टक्के मेद दिल्याने खाद्याचे ऊर्जेत रूपांतरण होण्याचे प्रमाण वाढते. आवश्यक खनिजे (अमोनियम क्लोराईड, सोडिअम बायकार्बनिट, पोटॅशिअम क्लोराईड आणि पोटॅशिअम सल्फेट) पिण्याच्या पाण्यातून दिल्याने उष्णतेचा ताण कमी करता येते. कोंबड्यांच्या खाद्यातून जीवनसत्त्व क आणि ई पुरविल्याने कोंबड्यांची उष्णतेच्या ताणाविरुद्ध लढण्याची किंवा प्रतिकार करण्याची शक्ती वाढते. तसेच, मांसल कोंबड्यांच्या शारीरिक वजनात लक्षणीय वाढ होते आणि अंडे देणाऱ्या कोंबड्यांचे प्रकृतीमान सुधारण्यास मदत होते.
बाहेरील तापमान वाढल्याने कोंबड्या खाद्य कमी खातात आणि पाणी जास्त पितात. म्हणूनच प्रत्येक १ अंश सेल्सिअस तापमान वाढीसाठी ७ टक्के पिण्याचे पाण्याचे (२१ अंश सेल्सिअस तापमान वाढीनंतर) प्रमाण वाढवावे.
ॲग्रोवन ५.४.२५