गीता परिवार'तर्फे कारागृहातील बंदींना श्लोक पठणाचे ऑनलाईन प्रशिक्षण

09 Apr 2025 10:21:25

sanskrutik vartapatra_bhagavad-gita-transforming-lives-in-maharashtra-prisons.jpg
 
मुंबई- क्रोध, द्वेष आणि घृणेपोटी किंवा परिस्थितीमुळे गुन्हे घडत असतात. अशा गुन्हेगारांच्या आयुष्यात भगवद्‌गीतेच्या माध्यमातून सकारात्मकतेची जोड दिल्यास त्यांच्या आयुष्यात नवी पहाट निर्माण होऊ शकते. याचा प्रत्यय सध्या महाराष्ट्रातील कारागृहातून १९० बंदीजनांच्या साधनेतून दिसून येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून कारागृहात भगवद्‌गीतेच्या श्लोकांचे सूर घुमत आहेत.
 
मागील वर्षभर 'गीता परिवारा'च्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्राच्या केंद्रीय कारागृहात भगवद्‌गीतावर्ग सुरू आहेत. स्वामी श्री गोविंद देवगिरीजी महाराजांनी स्थापन केलेल्या 'गीता परिवारा'तील स्वयंसेवक या उपक्रमामध्ये प्रशिक्षकाची भूमिका पार पाडत आहेत. 'गीता परिवारा'द्वारा आजतागायत १२ लाख साधकांना ऑनलाईन प्रशिक्षण दिले गेले आहे. पूर्णपणे निःशुल्क असे हे वर्ग १३ भाषांतून व २१ टाईम स्लॉट्समध्ये सोमवार ते शुक्रवार दररोज घेतले जात आहेत. हा वर्ग ४० मिनिटांचा आहे. वर्गामध्ये गीतेच्या श्लोकांचे शुद्ध उच्चारण शिकवले जाते. राज्यात या उपक्रमाचा व्यापक स्तरावर विस्तार करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
प्रत्येक अध्यायाचे अर्थ विवेचनसुद्धा ऑनलाईन माध्यमातून केले जात आहे. 'गीता परिवारा'कडून सरळ पठणीय गीतेची पुस्तके साधकांना उपलब्ध करून देण्यात आली आहेत. कारागृह अधिकारीआणि साधक या उपक्रमाबाबत समाधानी आहेत. याबरोबरच येरवडा महिला कारागृहामध्ये प्रत्यक्ष वर्ग घेण्यात आले. पुरुष बंदी बांधवांकरिता रविवारी उद्बोधनपर व्याख्याने घेतली जात आहेत.
 
मुंबई तरूण भारत ५.४.२५
Powered By Sangraha 9.0