सप्तशृंगी गडावर शनिवार, दि.५ एप्रिल पासून चैत्रोत्सवास प्रारंभ होत असल्याने आदिशक्ती भगवतीच्या पावननगरीत चैत्रोत्सवादरम्यान होणार्या गर्दीच्या अनुषंगाने आढावा घेत प्रशासन सज्ज होताना दिसून येत आहे.
चैत्र नवरात्र उत्सव- चैत्रोत्सवास चैत्र शुध्द म्हणजेच मार्च / एप्रिल महिन्यात रामनवमीपासून गडावर चैत्र उत्सव प्रारंभ होतो. हा उत्सव साधारणत: दहा ते बारा दिवस सुरु राहतो. या उत्सवात आईचं माहेर म्हणवल्या जाणार्या खानदेशातून लाखो संख्येने भाविक गडावर पायी येतात. अडीचशे किंवा त्याहून जास्त किलो मीटर पायी प्रवास करुन आईच्या दर्शनास येणार्या या भाविकांचा मिलन सोहळा पाहण्यासारखा असतो. या उत्सवात चावदस म्हणजेच चतुर्दशीच्या (खानदेशातील भाविक चतुर्दशीला चावदस असे म्हणतात) दिवशी खानदेशवासी मोठ्या संख्येने आईचं दर्शन घेतात व दुसर्या दिवशी असणार्या पैार्णिमेस घराकडे परततात. सप्तशृंगगडावर चैत्र उत्सवास लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनास येतात.
चैत्र पौर्णिमा व विजयादशमी या दिवशी आई सप्तशृंगीच्या शिखरावर दरेगावचे गवळी (पाटील) परिवार वंशपरंपरेने ध्वज लावतात.देवीच्या शिखरावर चढण्यासाठी मार्ग नाही.तरी देखील हे अवघड कार्य दरेगांवचे गवळी (पाटील)परिवार वंशपरंपरेने करीत आहेत.गवळी परिवारातील आजोबा रायाजी पाटील यांच्यापासून गडावर ध्वज लावण्याचे ते सांगतात.परंतु ध्वज लावण्याची प्रथा या पूर्वीची आहे.हा ध्वज ११ मीटर केशरी रंगाच्या कापडाचा बनवण्यात येतो. तसेच ध्वजासाठी १० फुट उंचीची काठी व सुमारे २० ते २५ किलो वजनाचे पूजा साहित्य घेऊन ध्वजाचे मानकरी ध्वज लावतात.
नंदुरबार,धुळे,शिरपूर तसेच संंपूर्ण जगभरात सप्तशृंगी देवीच्या चरणी लाखो भाविक हजेरी लावतात. या यात्रेत सहभागी होणार्या भाविकांना सोयीसुविधा मिळाव्यात म्हणून सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट तसेच सप्तशृंगीगड ग्रामपंचायत, पोलीस प्रशासन,महामंडळ,महावितरण कंपनी,रोप-वे ट्रॉली,वनविभाग,आपत्ती विभाग,सार्वजनिक बांधकाम विभाग,जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांनी आपापली जबाबदारी पार पाडावी,असे आदेश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिेले आहेत.
अनेक दुकानदारांनी श्रीक्षेत्र सप्तशृंगीगडावर यात्रेसाठी आपली दुकाने थाटली आहेत. रस्त्याच्या मध्यभागी भव्य दिव्य पथदिवे लावून सप्तशृंगीगडाचे सुशोभीकरण दिसून येत आहे. तसेच यात्रेची लगबग गडावर पाहावयास मिळत आहे.
देशदूत ३.४.२५