पुणे- प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे पाणी देण्यासाठी पुणे जिल्ह्यात एक हजार २३९ नळयोजनांची कामे जलजीवन मिशनअंतर्गत प्रस्तावित करण्यात आली आहेत. मागील दोन वर्षांत त्यातील ५५६ गावांतील योजनांची कामे पूर्ण होऊन त्या कार्यान्वित झाल्या आहेत. प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे पाणी मिळण्यास सुरुवात झाल्याने या गावांमधील महिलांची पाण्यासाठी होणारी पायपीट थांबली आहे.
केंद्र सरकारने 'हर घर जल' योजनेंतर्गत जलजीवन मिशनच्या माध्यमातून देशभरात प्रत्येकाच्या घरापर्यंत नळाद्वारे पाणी पोहोचविण्याची योजना कार्यान्वित केली आहे. पुणे जिल्ह्यात एक हजार ८४५ महसुली गावे आहेत. त्यापैकी १ हजार २३९ गावांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत, तर पाचशे गावांमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून गावांमधील घरांपर्यंत आता पाणी पोहोचले असून, हजारो कुटुंबीयांना पाणी मिळणार आहे. टप्प्याटप्प्याने उर्वरित गावांमध्ये योजना पूर्णत्वास जाण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त होत आहे. ग्रामीण भागातील महिला दूरवरून डोक्यावर हंडा ठेवून पाणी आणतात. तसेच दूषित पाण्यामुळे आजार होतात. हे आजार दूर करण्यासाठी आणि महिलांचे कष्ट दूर करण्यासाठी ही योजना फायदेशीर ठरत आहे. खेड तालुक्यातील सर्वाधिक १०० गावांमधील कामे पूर्ण झाली आहेत.
सकाळ ३.४.२५