करेगुट्टा डोंगरावर माओवाद्यांची गुहा

30 Apr 2025 14:30:00

sanskrutik vartapatra naxalvad_kareguttta-maoist-hideout-discovered-2025.jpg
महाराष्ट्र, छत्तीसगड आणि तेलंगण या तीन राज्यांच्या सीमेवर असलेल्या करेगुट्टा डोंगरावर सुरक्षा दलांची शोधमोहीम सुरू असून, या मोहिमेच्या सहाव्या दिवशी शनिवारी रात्री माओवाद्यांकडून वापरण्यात येणारी एक मोठी गुहा शोधण्यात सुरक्षा दलांना यश आले. मात्र, माओवादी येथून दुसरीकडे निघून गेल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. छत्तीसगडमधील डोंगरावर एक हजारांपेक्षा जास्त माओवाद्यांना घेरण्यासाठी सुरक्षा दलांचे विशेष अभियान सुरू आहे. पहिल्या दिवशी पाच माओवादी ठार झाले होते. त्यानंतर काही चकमकी झाल्याची माहिती आहे. मात्र, या चकमकीत सुरक्षा दलांना अद्याप यश मिळालेले नाही. डोंगररांगा असलेला या भागाला जवानांनी चारही बाजूने वेढले आहे. माओवाद्यांनी या डोंगराच्या चारही बाजूंनी स्फोटके पेरून ठेवली आहेत.

स्फोटके निकामी करून जवान डोंगरावर चढण्याच्या प्रयत्नात आहेत. शनिवारी रात्री डोंगराच्या एका भागावर गेलेल्या जवानांना एक मोठी गुहा सापडली. त्या गुहेत एक हजारांपेक्षा जास्त व्यक्ती राहू शकतात. तेथे योग्य ऑक्सिजन; तसेच पाणीपुरवठा आहे. याशिवाय इतरही व्यवस्था असल्याचे दिसून येते. त्यामुळे माओवाद्यांनी या ठिकाणाहून गेल्या तीन ते चार वर्षांपासून त्यांच्या कारवाया केल्या असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गुहा सापडल्यानंतर त्या भागात शोधमोहीम वाढवण्यात आली. २५० वर्ग किलोमीटरचा हा भाग असल्याने अजूनही मोठा भाग सुरक्षा दलांच्या निगराणीखाली येणे बाकी आहे.

महाराष्ट्र टाईम्स २८/४/२५ 
Powered By Sangraha 9.0