कैद्यांकडून शेती, स्वावलंबनाची नवी वाट

20 Apr 2025 10:30:00

Sanskrutik-Vartapatra_krushi_prisoners-learn-farming-skills-in-thane-jail-sell-vegetables-worth-3-lakh.jpg
औंधचे राजे पंत प्रतिनिधींनी स्वातंत्र्यपूर्व काळात एक प्रयोग केला होता. स्वतंत्रपूर खुली वसाहत या नावाने सांगलीपासून ४ किमी अंतरावर आटपाडीजवळ एक बिनभिंतीचा तुरुंग उभारण्यात आला. तिथे काही कैद्यांना साखळदंड आणि कुंपणाविना ठेवण्यात आले होते. त्यांना शेतात काम करण्यास दिले होते. कैद्यांना माणुसकीच्या भावनेने वागवून त्यांच्यात लपलेल्या चांगुल-पणाला साद घालायची कल्पना त्यामागे होती. अगदी इतक्या मोकळ्या वातावरणात नाही मात्र असेच काही प्रयोग सध्या आपल्याकडे होत आहेत. तुरुंगातल्या कैद्यांकडे तिरस्काराने न पाहता माणुसकीने वागवले जाते.
तसेच ठाण्याच्या सेन्ट्रल जेलमध्ये कैद्यांना शेतीचे प्रशिक्षण दिले जाते. त्याचा परिणाम म्हणून कैदी मोठ्या प्रमाणात भाज्या पिकवतात. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात कैद्यांनी १३,९२५ किलो भाज्या पिकवल्या. त्याची किंमत ३ लाख ५ हजार रुपये झाली. या भाज्या कैद्यांसाठी केलेल्या स्वयंपाकातही वापरतात.
शेती करीत असताना नवे प्रयोग केले जातात. कारागृहाच्या परिसरात १० एकर जागा आहे. पैकी ५ एकर जागेत शेती केली जाते. पालक, चवळई, लाल माठ, मुळा, भोपळा, कोथिंबीर, मेथी या भाज्या पिकवल्या जातात. सध्या २३ कैदी शेतीकाम करतात. शेतीसाठी लागणारी कीटकनाशकं आणि खतंही त्यांनीच तयार केली आहेत.
रोटरी क्लबच्या माध्यमातून या कैद्यांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात येते. कैद्यांचे कुशल, अर्धकुशल आणि अकुशल असे तीन प्रकार केले आहेत. त्यानुसार मजुरीचा दर ठरतो. कुशल कैदी- ६७/-रुपये, अर्धकुशल कैदी ६१/-रुपये आणि अकुशल कैदी ४८/-रुपये अशी मजुरी दिली जाते.
या प्रयोगामुळे कैद्यांना रोजगार मिळतो. एक नवीन कौशल्य प्राप्त होते. तुरुंगातून सुटका झाल्यावर त्यांना त्याचा उपयोग होईल. शेतीबरोबर बेकरी, शिलाई, भरतकाम, धोबीकाम ही कामेही शिकवली जातात.

दैनिक भास्कर ३.३.२५ 
Powered By Sangraha 9.0