पुण्यात स्वयंसेवकांनी गोळा केला ६ टन कचरा

17 Apr 2025 10:30:00

sanskrutik-vartapatra-anya_pune-volunteers-clean-6-ton-waste-ambedkar-jayanti.jpg
पुणे : पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालय येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आज लाखो अनुयायांनी हजेरी लावत अभिवादन केले होते. दिवसभरात या परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचला होता. 'इन्कलाब जयते' या सामाजिक संघटनेतर्फे या परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. जवळपास ३५० विद्यार्थी व पालिकेच्या काही कर्मचाऱ्यांनी ही मोहीम राबवत काही हजार किलो सुका व ओला कचरा गोळा करण्यात आला.
'इन्कलाब जयते' ही संस्था पुण्यात विविध सामाजिक कार्य राबवत असते. प्रामुख्याने स्वच्छता हा संस्थेचा विषय आहे. संस्थाप्रमुख विक्रम सिंग हे विविध कॉलेज तसेच शाळांमध्ये जाऊन स्वच्छतेचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून त्यांना पुन्हा कचरा न करण्याची शपथ देत असतात. महात्मा फुले जयंतीच्या दिवशी देखील या सामाजिक संस्थेतर्फे फुलेवाडा परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती. त्या वेळी ४४८० किलो सुका, तर १२४० किलो ओला कचरा गोळा - करण्यात आला होता.
सिंग म्हणाले, या स्वच्छता मोहिमेसाठी आम्ही आधीच योजना तयार केली होती. यासाठी पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत देखील आम्ही बैठक घेतली होती. स्वच्छता मोहीम कशी राबवावी, यासाठी एक रोडमॅप तयार करण्यात आला होता. त्यानुसार विविध कॉलेजमधील एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. यात प्रामुख्याने व्हीआयटी, व्हीव्हीआयटी, एनबीएम कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. काही वेळातच आम्ही संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय परिसर व येथील रस्ते चकाचक केले. या कचऱ्याची पालिकेमार्फत विल्हेवाट लावली जाणार आहे.

पुढारी १५.४.२५ 
Powered By Sangraha 9.0