निर्जलीकरण उद्योग- भाग १

16 Apr 2025 12:30:00

sanskrutik-vartapatra-krushi_dehydrated-vegetables-fruits-india-opportunity-2025
 
फळे व भाज्यांचे निर्जलीकरण
सुकविलेल्या भाज्या आणि फळांची मागणी दिवसेंदिवस वाढत असून हॉटेल्स, दुकाने आणि घरगुती वापरासाठी मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. या उद्योगाला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली मागणी आहे. भाजीपाला पिकांवर घरगुती प्रक्रिया करून महिला बचत गट आणि लघुउद्योगांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात, ज्यायोगे आर्थिक फायदा मिळू शकतो. भारत हा जगात भाजीपाला आणि फळांच्या उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर असून, जागतिक उत्पादनाच्या १५% भाजीपाला उत्पादन भारतात होते. तथापि, योग्य हाताळणीअभावी एकूण उत्पादनाच्या सुमारे १८% भाजीपाला आणि फळांचे नुकसान होते, ज्यामुळे शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान होते. भारतात केवळ २% भाजीपाला आणि फळांवर प्रक्रिया केली जाते, जी फारच कमी आहे. हे प्रमाण वाढवण्यासाठी प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. भाजीपाला आणि फळांची टिकवणूक आणि मूल्यवर्धन करण्यासाठी निर्जलीकरण हा एक सोपा आणि फायदेशीर पर्याय आहे, जो नाशवंत उत्पादनांचे नुकसान कमी करून अधिक आर्थिक लाभ देतो.
निर्जलीकरण म्हणजे काय ?
भाजीपाला हा नाशवंत असल्याने त्यातील अतिरिक्त नैसर्गिक जल आणि जीवाणूंमुळे सडण्याची क्रिया वेगाने होते, ज्यामुळे शेतमाल अखाद्य बनून वाया जातो. अधिक जलांश असल्यास सडण्याचा वेग अधिक असतो, जसे की कोथिंबीर, टोमॅटो आणि पालेभाज्या. काही फळभाज्यांचे नैसर्गिक आयुष्य अधिक असले तरी बाजारभाव नसल्यास त्या देखील वाया जातात. भाजीपाला निर्जलीकरण ही त्यातील आर्द्रता कमी करून वजन घटवण्याची क्रिया असून, त्याद्वारे सूप, पावडर, लोणची, मोठी मसाले यांसारख्या उत्पादनांसाठी भाज्यांचा उपयोग करता येतो. फळे व भाजीपाला साठवणुकीचा कालावधी वाढवण्यासाठी सुकविणे ही महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे. तांत्रिक पध्दतींनी पाण्याचा अंश कमी करून साठवण कालावधी वाढविता येतो. प्रतवारीनुसार वेगवेगळ्या पध्दती वापरल्यास गुणवत्तेत फरक आणि पडतो, मात्र सुकवलेल्या भाज्यांचा वापर हा टिकवणुकीसाठी प्रभावी ठरतो.
 
कृषी पणन मित्र २०२५
 
Powered By Sangraha 9.0