अयोध्येतील श्रीराम मंदिरात अक्षय्य तृतीयेला ‘श्रीराम दरबारा’ची स्थापना

11 Apr 2025 17:30:00

sanskrutik-vafrtapatra_ayodhya-shri-ram-darbar-installation-akshaya-tritiya
 
नवी दिल्ली- अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिरात अक्षय्य तृतीयेस अर्थात दि. ३० एप्रिल रोजी 'श्रीराम दरबारा' ची स्थापना करण्यात येणार आहे. यानिमित्त अनेक धार्मिक प्रक्रिया पार पडणार आहेत.
श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे सरचिटणीस, चंपतराय यांनी बुधवार, दि. ९ एप्रिल रोजी अयोध्येतील कारसेवकपुरम येथे पत्रकार परिषदेस संबोधित केले. यावेळी ते म्हणाले, "दि. ३० एप्रिल रोजी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी 'श्रीराम दरबारा'ची स्थापना होईल. त्यानंतर जूनमध्ये एक पवित्र तारीख निश्चित करून सर्व मूर्तीचे अभिषेक केले जातील. हा तीन दिवसांचा कार्यक्रम असेल. मुख्य दिवसाच्या दोन दिवस आधीपासून जलवास, अन्नवास, औषधाधीवास, शय्यवास यांसारख्या अनिवार्य धार्मिक प्रक्रिया पूर्ण केल्या जातील," असे ते म्हणाले.
"मंदिरातील अन्य मूर्तीचेही काम अंतिम टप्प्यात आहे," असे चंपतराय यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, "साधारणपणे दि. १५ एप्रिल रोजीनंतर मूर्ती आणण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. त्यामध्ये सप्तमंडपातील महर्षी वाल्मिकी, गुरू वसिष्ठ, विश्वामित्र, अगस्त्य, निषादराज, शबरी, अहिल्या आदींच्या मूर्ती तयार होणार आहेत. कपडे आणि दागिने बनवले जात आहेत. अन्नपूर्णा, हनुमान आणि किल्ल्यावरील शिव यांच्यासह सर्व सहा मंदिरांच्या मूर्तीदेखील आणण्यात येणार आहेत," असे चंपतराय यांनी नमूद केले आहे.
मुंबई तरुण भारत १०.४.२५
 
Powered By Sangraha 9.0