भारतामध्ये अशी कोणीही व्यक्ती नाही जिला सापशिडी हा खेळ माहित नसेल.या खेळाची निर्मिती भारतात झाली आहे. याची माहिती अनेकांना नसेल. आज आपण सापशिडीकडे केवळ मनोरंजन म्हणून बघतो. परंतु हा खेळ आध्यात्मिक दृष्टीकोनातून तयार केला गेला आहे. यामागे भारतीय तत्वज्ञान कसे दडले आहे, ही जाणून घेऊ.
१०० चौंकटी ज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वर जाण्यासाठी शिडी असते आणि वेगवेगळ्या ठिकाणी सापसुद्धा असतात. ज्या चौकटीमध्ये साप असतो त्यावर आपण गेलो कि साप आपल्याला चावतो आणि आपण वरून खाली जातो. ज्याठिकाणी शिडी असेल त्याठिकाणी आपण वर जातो. एकावेळेस दोन किंवा अधिक खेळाडू यामध्ये खेळू शकतात. जो खेळाडू सापांपासून वाचत वाचत लवकर पुढे जातो आणि १०० या आकड्यावर येतो तो जिंकतो. लहान मुले करमणुकीसाठी खेळतात.
साप शिडीचा खेळ भारतात इसवीसन पूर्व दुसऱ्या शतकापासून अस्तित्वात होता. हा खेळ मोक्षपट, मोक्षपटम, वैकुंठपाली, मोक्ष पटमु, लीला अशा विविध नावांनी भारतात ओळखला जात होता.
भारतामध्ये पूर्वी या खेळाकडे बघण्याची दृष्टी ही आध्यात्मिक होती. भारतीय परंपरेत मानवी जीवन हे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थावरअधिष्ठित आहे.ही जगण्याची नैतिक मूल्ये आहेत. धर्म म्हणजे सामाजिक आणि नैतिक नियमाचे पालन करून जीवन जगणे. अर्थ म्हणजे जीवनासाठी आवश्यक असणारी संपत्ती कमावणे. काम म्हणजे मानवी जीवनातील आवश्यक इच्छांची योग्य मार्गाने पूर्तता करणे. सर्वात शेवटी मोक्ष . मोक्ष म्हणजे जीवनातील सर्व टप्पे पूर्ण करून कोणत्याही वासनेत न अडकल्याने जन्म- मृत्युच्या फेऱ्यातून सुटका होते. जीवनातील शेवटचे उदिष्ट हे मोक्ष आहे.
अनेकांच्या मते हा खेळ संत ज्ञानेश्वरांनी तयार केला आहे तर अनेकांच्या मते हा जैन मुनींनी तयार केला आहे. यामुळे नेमक्या कोणी याची निर्मिती केली हे सांगता येऊ शकत नाही. पण भारतीय तत्वज्ञान या खेळामध्ये दिसून येते. मोक्षपट नावावरूनच लक्षात येते की हा खेळ मानवी जीवनात मोक्षप्राप्ती मिळवण्यासाठी प्रत्यक्ष जीवनात कोणकोणत्या अडचणी येतात याची जाणीव करून दिली जात होती.
यामध्ये सापांची संख्या जास्त आहे आणि शिड्यांची संख्या कमी आहे. कारण जीवनात सत्य किंवा मोक्षाचा मार्ग अत्यंत कठीण आहे आणि वाईट किंवा कुकर्म करण्यासाठी अनेक मार्ग आहेत ज्यामुळे तुम्ही सहज जन्म-मृत्युच्या फेऱ्यात अडकता याची जाणीव करून द्यायची आहे.
जैन परंपरेत सापडलेल्या या खेळाला ‘ ज्ञान चौपर’ म्हणून ओळखले जात होते. हा खेळ पर्युषण पर्वात खेळला जात असे. तमिळनाडूमध्ये विष्णूभक्त हा खेळ परम पद म्हणून ओळखतात. हा वैकुंठ एकादशीच्या रात्री खेळला जात असे. भारतीय परंपरेतील प्रत्येक पटावर विविध देव- देवतांचे चित्र आहे. वरच्या बाजूला वैकुंठ आणि खालील बाजूला नरक असे चित्र देखील काही पटांवर आहे.
वायुवेग २०.३.२५