भारत-मॉरिशसमध्ये धोरणात्मक भागीदारी

17 Mar 2025 16:00:00
   
International17.03.2025
   
 
   पोर्ट लुईस : वृत्तसंस्था भारत आणि मॉरिशसने आपले संबंध 'सशक्त धोरणात्मक भागीदारी'च्या स्तरावर नेले असून, व्यापार आणि सागरी सुरक्षेसह विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी आठ करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'ग्लोबल साउथ'च्या विकासासाठी एक महत्त्वाकांक्षी दृष्टिकोन जाहीर केला आहे.
 
   या करारात राष्ट्रीय चलनांच्या वापरास प्रोत्साहन, सागरी माहिती शेअरिंग, मनी लॉन्ड्रिंगविरोधी संयुक्त कार्य आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्रातील सहकार्याचा समावेश आहे. मोदी दोन दिवसीय मॉरिशस दौऱ्याच्या अंतिम दिवशी मॉरिशसच्या राष्ट्रीय दिन सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून सहभागी झाले. भारतीय नौदलाची युद्धनौका आणि हवाई दलाच्या आकाशगंगा स्कायडायव्हिंग पथकानेही या सोहळ्यात सहभाग घेतला.
 
   मॉरिशसचे पंतप्रधान नविनचंद्र रामगुलाम यांच्यासोबतच्या चर्चेनंतर मोदींनी हा नवा धोरणात्मक दृष्टिकोन जाहीर केला. हा दृष्टिकोन चीनच्या हिंद महासागर क्षेत्रातील वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा मानला जात आहे. मोदी म्हणाले, "मुक्त, सुरक्षित आणि स्थिर हिंद महासागर हे भारत व मॉरिशस यांचे समान प्राधान्य आहे. दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्य आणि सागरी सुरक्षा हा धोरणात्मक भागीदारीचा महत्त्वाचा घटक आहे. मॉरिशसच्या विशेष आर्थिक क्षेत्राच्या सुरक्षेसाठी भारत पूर्ण सहकार्य करेल."
 
 
पुढारी १५.३.२५
Powered By Sangraha 9.0