पिंपरी : जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या ३७५ व्या बीज सोहळ्यानिमित्त सर्वांत मोठ्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पगडीचा लोकार्पण सोहळा मंगळवारी झाला. या पगडीची 'वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडिया अँड जिनिअस'मध्ये नोंद झाली आहे.
तीर्थक्षेत्र देहूतील जगद्गुरू संत तुकाराम महाराज मुख्य मंदिरात हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. संत तुकाराम महाराज देवस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज मोरे हे यावेळी उपस्थित होते. पुरुषोत्तम महाराज मोरे म्हणाले, संत तुकाराम महाराजांच्या सर्वांत मोठ्या पगडीचे लोकार्पण झाल्याने वारकरी संप्रदाय आनंदित झाला आहे.
प्रसिद्ध कारागीर शैलेश यादव यांनी पगडी तयार केली आहे.पगडी बनवण्यासाठी व पूर्व तयारीसाठी दोन महिने लागले. या पगडीचा घेर हा २२ फुटांचा असून, उंची ४ फूट आहे. ५०० मीटर सुती कापडापासून पगडी साकारली आहे, संत तुकाराम महाराज मंदिराच्या गाभाऱ्यात पगडी भाविकांसाठी दर्शनाकरिता ठेवण्यात येणार आहे.