प्रजासत्ताक दिनाचा मुख्य सोहळा दरवर्षी राजधानी दिल्लीतील कर्तव्यपथावर मोठ्या दिमाखात पार पडतो. या कार्यक्रमाला राष्ट्रपती, पंतप्रधान तसेच अनेक मान्यवर उपस्थित असतात. संपूर्ण देश आणि जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या या सोहळ्यात भारताच्या सामर्थ्याचे आणि महान सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडते. कर्तव्य पथावरील पथसंचलनात भारतीय वायू सेनेची भव्य तुकडीही सामील असते. यंदा या पथसंचलनात वायू सेनेच्या १४४ सदस्यांच्या तुकडीचे नेतृत्व चार अधिकाऱ्यांनी परेड कमांडर म्हणून करायचे आहे. विशेष म्हणजे, या नेतृत्वात बीड जिल्ह्यातील फ्लाईट लेफ्टनंट दामिनी देशमुख यांचाही समावेश आहे.
दामिनी देशमुखच्या या ऐतिहासिक भूमिकेमुळे बीड जिल्ह्याच्या नावलौकिकात भर पडली असून, तिच्या कर्तृत्वाने संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटतो आहे. दामिनी यांचे वडील न्यायधीश दिलीप देशमुख हे पुणे विभागाचे माजी धर्मादाय आयुक्त असून त्यांचा कुटुंबियांचा सामाजिक आणि शैक्षणिक वारसा दामिनीने आपल्या मेहनतीने पुढे नेला आहे. त्यांनी वर्ष २०१९ मध्ये देशपातळीवरील कॉमन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवत भारतीय वायुदलात फ्लाईंग ऑफिसर पद मिळवले. दामिनी देशमुख यांनी अश्वारोहण, कराटे, योगा, रायफल शूटिंग, खो-खो आणि व्हॉलीबॉलमध्ये प्राविण्य मिळवले असून त्या कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट सुवर्णपदक विजेत्या आहेत.
दैनिक भास्कर २४.१.२५