काश्मीरमधील घातपात प्रकरणी भारतीय तुरुंगात खितपत पडलेल्या दहशतवाद्यांना आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेकडून 'मानवी कुरिअर'कडून गुप्त संदेश पाठविण्यात येत असल्याचे उघड झाले आहे. ड्रग्ज आणि अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या युवकांचा वापर करून काश्मीरमधील दहशतवाद्यांना रसद पोहचवली जात आहे.
अलीकडच्या काळात तपास यंत्रणांनी लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांसह अन्य दहशतवाद्यांना अटक केली आहे. या दहशतवाद्यांना गोपनीय माहिती पुरविण्यासाठी आयएसआयकडून मानवी कुरिअरचा वापर केला जात आहे.
* मानवी कुरिअरसाठी नशेच्या आहारी गेलेल्या अथवा मानसिकदृष्ट्या खचलेल्या तरुणांचा वापर केला जात आहे. या तरुणांची व्याप्त काश्मिरातून घुसखोरी घडवून आणली जात आहे.
* पंजाब, राजस्थान आणि काश्मीरमधून अलीकडे दहा घुसखोरांना अटक केली आहे. मोबाईल, इंटरनेटऐवजी मानवी ढाल वापरून 'आयएसआय' काश्मिरातील दहशतवाद्यांना मदत पुरवित असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मानवी कुरिअरचा वापर करण्याची 'आयएसआय'ची पद्धत जुनी आहे. १९९० आणि २०२० च्या दशकामध्ये समझोता एक्स्प्रेसच्या माध्यमातून दहशतवाद्यांना रसद पुरविण्यासाठी 'आयएसआय' कडून ड्रग्जची तस्करी केली जात होती.
व्याप्त काश्मीरमधील 'आयएसआय'ची हेरगिरी रोखण्यासाठी तपास यंत्रणांनी नवीन कार्यपद्धती विकसित केली आहे. काश्मीर अस्थिर करण्यासाठी डाव हाणून पाडण्यासाठी तपास यंत्रणा कार्यरत आहेत.
पुढारी १०.१२.२४