आयुर्वेद : उपयुक्त चिकित्सा पद्धती

SV    28-Sep-2024
Total Views |
 
  भारतीय आयुर्वेदाला पाच हजार वर्षाचा इतिहास आहे. मुख्य निर्माते अग्निवेश आणि अनुवादक चरक यांची चरक संहिता तसेच सुश्रुत संहिता,  अष्टांग संग्रह  असे सर्व ग्रंथ भारतीय आयुर्वेदाचे आधार आहेत. आयुर्वेदामधील 'आयु' म्हणजे जीवन आणि 'वेद' म्हणजे विज्ञान होय. आयुर्वेद म्हणजेच जीवनाचे विज्ञान होय. आयुर्वेद हे उपचारापेक्षा निरोगी जीवनावर अधिक भर देते. आयुर्वेद हे फक्त शरीरापुरते बोलत नाही तर ते शरीर, मन आणि आत्मा यावरही भाष्य करते. आयुर्वेद ही एक चिकित्सापद्धती असून त्यात व्याधीचे म्हणजे रोगाचे  समूळ कारण शोधून त्यावर उपचार केले जातात. यालाच 'निदान परिमार्जन' असेही म्हटले जाते. आयुर्वेदतज्ञ   सर्वप्रथम व्यक्ति कोणत्या प्रकृतीची आहे ते निश्चित करतात आणि त्यानंतर उपचार करतात.
मानवात एकूण दोन दोष आढळून येतात. एक शरीरदोष आणि दुसरा मानसदोष होय. शरीरदोष हे वात, कफ आणि पित्त यांचे शरीरातील प्रमाण असंतुलित झाल्याने होतात तर मानसदोष हे सत्त्व, रज आणि तम यांचे असंतुलन झाल्याने निर्माण होतात.
प्राचीन तत्वज्ञान असे सांगते की विश्वातील कोणतीही गोष्ट या पंचमहाभूतांनी (पृथ्वी,जल,वायू,अग्नी आणि आकाश यांनी) बनलेली आहे. अगदी तसाच मानवी देहसुद्धा या पंचमहाभूतांपासून बनला आहे. या पंचतत्वाच्या परस्पर क्रियेमुळे शरीराचे तीन गुणधर्म तयार होतात. वायू आणि आकाश यातून वात निर्माण होतो. जल आणि अग्नि यातून पित्त निर्माण होते. पृथ्वी आणि जल यातून कफ तयार होतो. कफ छातीमध्ये, पित जठरामध्ये तर वात हा स्नायू पोकळीमध्ये राहतो. म्हातारपणी वायू प्रकोप,  युवावस्थेमध्ये पित्ताचा प्रकोप अधिक दिसून येतो. तर बालपणी कफाचा प्रकोप अधिक दिसून येतो. वात, कफ आणि पित्त यांचे प्रमाण जेव्हा कमी जास्त होते त्यावेळी शारीरिक दोष अथवा व्याधी अथवा विकार तयार होतात.
जेव्हा वाताचा असमतोल होतो तेव्हा सांधेदुखी, डोकेदुखी, वजन कमी होणे, थकवा येणे, कोरडेपणा  जाणवणे ही लक्षणे दिसून येतात. तर पित्ताचा असमतोल निर्माण झाल्यास उच्च रक्तदाब, जळजळ, पुरळ, शरीरावर सूज, आम्लपित्त वाढणे ही लक्षणे दिसून येतात. कफातील असमतोल भूक न लागणे, मळमळ, नैराश्य निर्माण करतो.
वात संतुलनासाठी आयुर्वेदिक तेलाने मालीश करावे. लसूण सेवन करून, हळद घालून दूध तसेच दालचिनीचा वापर करावा. कफ संतुलन साधण्यासाठी मध सेवन तसेच  हिरव्या पालेभाज्या आणि ज्वारीची भाकरी उपयोगी ठरते. ताक आणि पनीर यांचाही उपयोग होतो.  गरम पाणी पिणे, उन्हात उभे राहणे याचाही उपयोग होतो. पित्त संतुलन साधण्यासाठी देशी गायीचे  तूप, नारळ पाणी तसेच लिंबू आणि पुदिना, मोड आलेली कडधान्य यांचा वापर करावा.

राजीव नंदकर यांच्या ब्लॉगवरून