आपल्या प्राचीन समाजाला सुसंस्कृत आणि सार्थ मानवी जीवनाची शाश्वत मूल्ये प्रदान करणाऱ्या ऋषीपरंपरेसंबंधी खरोखर आपण अतिशय कृतज्ञ असावयास पाहिजे. कारण आपल्या जीवनाची उभारणी, त्याची धारणा आणि त्याची जीवनशक्ती त्यांनी केवळ राज्यसत्तेवर अवलंबून ठेविलेली नाही. राजकीय सत्तेबरोबर पैसा, प्रतिष्ठा, अधिकार सारे काही प्राप्त होते अशा दिमाखाने लोक वावरतात. ज्या क्षेत्रातील काहीही कळत नाही तिथे भाषणे ठोकतात. लोकही सत्तेवर असेल त्याला निमंत्रणे देण्यासाठी धडपडतात. आधुनिक काळात शासनसत्तेचे हात शिक्षणापर्यंत, घरापर्यंत, येवढेच नव्हे तर अगदी चुलीपर्यंत पोचले आहेत. सगळे जीवन जणू राजकारण- सापेक्ष झाले आहे.राजकारण समाजासाठी आवश्यक आहे. पण राजकारणाने समाजालाच व्यापून टाकले तर ते समाजासाठी धोक्याची घंटा असणार हे निश्चित !
आम्ही पुत्र अमृताचे -चं.प.भिशीकर