दुर्गम भातपट्ट्यात आंबा बागेचा प्रयोग

SV    09-Jul-2024
Total Views |
 
 विदर्भातील गोंदिया हा दुर्गम तसेच भाताचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील धाबेटेकडी (ता. अर्जुनी मोरगाव) गाव आहे. इडियाटोह प्रकल्पाचे पाणी या भागातील शेतीला मिळते.
गावातील ललित सोनवणे हे अल्पभूधारक असून त्यांच्याकडे अवघी तीन एकर शेती आहे. त्यात पारंपरिक धान (भात) घेण्यावरच त्यांचा भर होता. दरांत होणाऱ्या चढ-उतारामुळे अपेक्षित उत्पन्न होत नसल्याने पर्यायी पिकाचा शोध ललित यांनी घेण्यास सुरुवात केली होती.
ग्राहकांकडून कायम मागणी असलेले, पैसा देणारे, तुलनेने कमी मजूरबळ लागणारे व विदर्भातील वातावरणात तग धरणारे पीक म्हणून आंबा हे पीक त्यांना योग्य वाटले. त्यानुसार दोन एकर धान व उर्वरित एक एकर आंबा लागवडीचे नियोजन केले. एकदिवसीय प्रशिक्षण घेतले. शास्त्रोक्त आंबाबाग व्यवस्थापनाचे तंत्र जाणून घेतले. प्रामुख्याने केसर व दशहरी या जातींच्या आंबा वाणांची लागवड जुलै २०१९ मध्ये केली. दहा बाय चार फूट या पद्धतीने एका एकरात सुमारे एक हजार झाडांचे व्यवस्थापन सुरू केले आहे. सुरुवातीपासूनच सेंद्रिय खतांच्या वापरावर सर्वाधिक भर दिला. घरच्या दोन देशी गायी, म्हैस अशी चार जनावरे आहेत. त्यांच्या शेण-गोमूत्रापासून जीवामृत तयार केले जाते. पाण्यासाठी बोअरवेल, कॅनॉलची सुविधा असून, ठिबकसिंचन केले आहे.
अभ्यास व लागवड नियोजन
ललित यांचा अभ्यास दौऱ्यात आंबा बागायतदारांशी संपर्क आला होताच त्यातूनच पुणे, पिंपरी-चिंचवड भागांत आंब्याच्या विविध जाती घेतलेल्या एका आंबा बागायतदाराशी संपर्क होऊन त्यांच्याकडे जाणे झाले.
व्यापारी, मध्यस्थ यांना आंबा न देता थेट ग्राहकांनाच सर्व विक्री करायची असेच ठरविले होते. त्यानुसार बाजारपेठ मिळविण्यासाठी सोशल मिडीयाचा वापर सुरू केला. आंबा बागायतदारांच्या विविध व्हॉट्सअॅप ग्रुपवर ललित आहेत.
मोरगाव अर्जुनी या तालुक्याच्या ठिकाणी ललित यांचे भागीदारीत कृषी सेवा केंद्र आहे. तेथेही आंबा विक्रीस ठेवला. शिवाय मित्राच्या 'जनरल स्टोअर्स मध्ये उपलब्ध केला. या सर्व प्रयत्नांमधून संपूर्ण म्हणजे दीड टनांपर्यंत आंब्याची विक्री झाली.

 अॅग्रोवन ६.४.२४