शेरास सव्वाशेर

SV    10-Jul-2024
Total Views |
 
 एक गरीब साधा भोळा खेडूत एके दिवशी शहरात भटकण्यासाठी आला. मिठाईच्या एका दुकानात थाळ्यांमधून निरनिराळ्या प्रकारची मिठाई आकर्षक रीतीने मांडली होती. ती पाहून त्याचे मन फारच प्रसन्न झाले. खरं तर ती त्याला विकत घ्यावीशी वाटत होती पण जवळ पैसे नसल्याने तो मुकाट्याने मिठाईकडे बघत होता. दुकानदार आगाऊ होता. तो त्या माणसाला म्हणाला , ‘चल पैसे काढ’ त्या भोळ्या खेडूताने विचारले, ‘कसले? मी तर काहीच घेतले नाही.’ दुकानदार म्हणाला, ‘वास घेण्याचे पैसे पडतात. एक रुपया तरी दे; नाहीतर पोलिसाला बोलावेन’. तो माणूस घाबरला. एक शहरी माणूस ते बघत होता. दुकानदाराची चलाखी त्याच्या लक्षात आली. त्याने खिशातून एक नाणे काढले. मिठाईच्या कपाटावर खणकन वाजवले आणि म्हणाला ‘ हे घ्या त्या माणसाचे पैसे’. प्रत्यक्षात ते नाणे त्याने परत खिशात टाकले.
दुकानदाराने विचारले, ‘कुठे आहेत पैसे?’ तो चतुर माणूस म्हणाला, ‘तुझे पैसे तुला मिळाले आहेत. जर मिठाईचा सुगंध घेणे म्हणजे खाणे किंवा खरेदी करणे  असेल तर रुपयाचा आवाज ऐकणे म्हणजे पैसे मिळणेच नाही काय?’ दुकानदार निरुत्तर झाला.

 विद्याभारती प्रकाशन