भारतात लोकशाही शेवटच्या घटका मोजतेय? संविधान खरच धोक्यात आल आहे का?

SV    07-Jun-2024
Total Views |
 
  विद्यमान विरोधी पक्ष सध्या भारतात अघोषित आणीबाणी लागू झाली आहे असा प्रचार करीत आहेत तर काही समाजसेवक म्हणतात भारतात लोकशाही शेवटच्या घटका मोजत आहे. भाजपचे काही बंडखोरदेखील देशात हुकुमशाही लागू झाली आहे अशी भाषा करीत आहे. या सगळ्याचा सामूहिक विचार केला तर देशात संविधान आणि लोकशाही दोघांसाठी धोका निर्माण झाल्याचे स्पष्ट होते.  यावर वेळीच अटकाव घातला गेला नाही तर लोकशाही संपुष्टात येईल आणि संविधानदेखील भगव्या रंगात बदलले जाईल. यावर उपाय काय हे जनतेला समजावून सांगावे लागेल कारण उपाय केले नाही तर हा देश आपली ओळख गमावून बसेल. या देशाची ओळख गंगा- जमुना संस्कृतीमुळे आहे, परस्पर भाईचारा, सद्भाव आणि एकता ही त्याची मूल्ये आहेत. ही संस्कृती वाचविण्यासाठी जोपर्यंत सर्व धर्मनिरपेक्षतावादी लोक एकत्र येऊन मतदान करीत नाही तोपर्यंत परिवर्तन होणार नाही. या परिस्थितीत बदल घडविण्यासाठी लोकसभा निवडणूक हे प्रभावी साधन होऊ शकते. जर जनतेने एकतर्फी इंडिया आघाडीला मतदान केले तर संविधान वाचू शकते त्यामुळे त्याकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना घरी बसविता येईल. आता प्रश्न असा की इंडिया आघाडीला मजबूत कसे करता येईल, केवळ मौखिक पाठिंब्याने काम होणार नाही. प्रत्येकाला यासाठी तयारी करावी लागेल, क्षमतेप्रमाणे वेगवेगळ्या अभियानात सहभाग घ्यावा लागेल, अधिकाधिक मतदान होईल यासाठी प्रयत्न करावा लागेल.  इव्हीएम मशीन, तपास संस्था आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या कारवाया या तीनही फ्रंटवर भाजपला फायदा होत आहे. या तीनही फ्रंटचा सामना इंडिया आघाडीला करायचा आहे, या लढाईत बहुसंख्य जनता इंडिया आघाडीसोबत आहे. या बहुसंख्य जनतेलादेखील या लढाईत सहभागी करून घ्यावे लागेल. पहिल्या टप्प्याचे मतदान पार पडले आहे, मोठ्या प्रमाणावर खोटा प्रचार केला जात आहे. याचा सामना करण्यासाठी जमिनीवर काम करणाऱ्याच्या छोट्या  छोट्या टीम असल्या पाहिजेत. हे काम करताना एक गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायला हवी की भारतात लोकशाहीला इतक्या सहजतेने संपविले जाऊ शकत नाही, तसा प्रयत्न मूठभर सत्ताधाऱ्यांनी केला तर संपूर्ण देश त्याविरोधात उभा राहील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा एका सभेत यावर बचावात्मक पवित्रा घेतला, भारतीय संविधानाचे निर्माते बाबासाहेब आंबेडकर आहेत त्यामुळे कुणीही संविधान बदलू शकत नाही, काँग्रेस केवळ अपप्रचार करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. निवडणुका असल्यामुळे पंतप्रधानांचे तोंड उघडले आहे, परंतु भारतीय दंडसंहिता संपूर्ण बदलून टाकण्यात आली, अनेक कायद्यांमध्ये बदल करण्यात आले. कायद्याचे धर्मनिरपेक्ष स्वरूप बदलून ते हिंदुराष्ट्रासाठी अनुकूल बनविण्यात येत आहे. हिंदुराष्ट्र हे पूर्णत: असंवैधानिक आहे. भाजप-संघाचे मुख्य उद्दिष्ट हे हिंदुराष्ट्र स्थापनेचे आहे, त्यासाठी ते जवळपास १०० वर्षे काम करीत आहे. त्यांची एवढी मेहनत हिंदुराष्ट्रासाठी तर आहे. हिंदुराष्ट्राचे त्यांचे उद्दिष्ट आता हिंसाचार, हाणामाऱ्या किंवा दंगली घडवून पूर्णत्वास येणार नाही हे ते ओळखून आहेत त्यामुळे हे काम त्यांनी नोकरशाहीच्या माध्यमातून करण्याचे ठरविले आहे.      
लोकसभा निवडणुकीत परिवर्तन घडविण्यासाठी फक्त मजबूत इरादा असून भागणार नाही तर सतत सतर्क रहावे लागेल. सध्याचे सरकार लोकशाही व्यवस्थांची ज्या पद्धतीने पायमल्ली करीत आहे ते या अगोदर कधीही बघायला मिळालेले नाही. मत मिळवण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न केले जात आहे, लोकांना त्यांच्या हातावर चंद्र आणून देऊ अशी आश्वासने दिली जात आहेत परंतु दिवसागणिक भाजपसाठी निवडणूक अवघड होत चालली आहे. त्यामुळे खोटानाट्या प्रचाराने जोर धरला आहे. धर्मनिरपेक्ष विचाराच्या लोकांनी याचा जोरदार प्रतिकार केला पाहिजे. भाजपची अवस्था दयनीय झालेली आहे, त्याचे एक कारण भाजपात मोठा अंतर्गत कलह सुरू आहे. राजस्थानात एका सभेत मुख्यमंत्री जेव्हा मोदींच्या कामाचा महिमा गात होते तेव्हा सभेला आलेले लोक सभामंडप सोडून निघून गेले. साधारण याच पद्धतीचे चित्र संपूर्ण देशभर असेल तर भाजपचा पराभव निश्चित आहे. भारताच्या गंगा-जमुना संस्कृतीला दफन करण्याचा भाजपने विडा उचलला आहे हे भारतीय जनतेने ओळखले आहे. भारताची लोकशाही ही या देशाची शान आहे, या देशात विविध धर्माचे लोक गुण्या-गोविंदाने राहतात, या सर्वधर्मीय समाजात विष कालविणारे कोण हे लोकं जाणतात.
या परिस्थितीत मुसलमानांची जबाबदारी आहे की त्यांनी मतदानाबद्दल जागरूक व्हावे. अधिकाधिक संख्येने मुसलमानांनी मतदान केले नाही तर त्यांचे भविष्य धोक्यात आहे हेदेखील त्यांनी लक्षात घ्यावे.  मुसलमानांनी आपले मतदान एकाच उमेदवाराला जाईल याची खबरदारी घ्यावी आणि मतविभाजन टाळावे. त्यामुळे पुढील सरकार बनविण्यात आपला महत्वाचा वाटा असेल.          

- फारूक अन्सारी
उर्दू टाईम्स , २० एप्रिल २०२४