दयाळू बालक

SV    24-Jun-2024
Total Views |
 
 संध्याकाळची वेळ होती, थंडीचे दिवस होते. हवेत खूप गारठा होता. एक छोटा मुलगा नदीकाठी बसून  आकाशाकडे पाहत होता. इतक्यात पाठीमागून आवाज आला, "भय्या, घरी चल. रात्र होण्यास सुरुवात होईल." मुलाने मागे वळून पाहिले. त्याची मोठी बहीण मागे उभी होती. ती म्हणाली, "आज  फारच थंडी  आहे. आईने तुला पांघरण्यासाठी लोकरीची शाल दिली आहे. ती पांघरून  घरी चल." मुलाने ती शाल आपल्या ताईच्या हातातून ओढून घेतली. चटकन अंगावर टाकली आणि बहिणीबरोबर तो घरी निघाला. जाताना रस्त्यात त्याने एक भिकारी पाहिला. त्याच्या अंगावरचे कापडे अगदी फाटकेतुटके होते. थंडीने तो कुडकुडत होता. ते पाहून मुलाचे मन दयेने भरून आले. आपल्या अंगावरील शाल त्याने भिकाऱ्याच्या अंगावर पांघरली आणि  त्याला म्हणाला, "बाबा भीक मागणं काही चांगलं  नाही. परमेश्वराने तुम्हाला धडधाकट हातपाय दिले आहेत. तेव्हा मेहनत करा आणि  कष्टाची भाकरी खा.मेहनत करणारा कधी दुसऱ्यापुढे हात पसरत नाही किंवा दारोदारी मदतीसाठी भटकत नाही." बालकाचे  बोलणे ऐकून भिकारी त्याच्याकडे बघतच राहिला. ते शब्द त्याच्या अंतःकरणावर  कोरले गेले. त्याचे सारे जीवन त्या दिवसापासून एकदम बदलले, भीक मागण्याचे त्याने सोडून दिले. मोलमजुरी करून तो आयुष्य जगू लागला. हा तेजस्वी मुलगाच मोठेपणी संत गुरुनानक म्हणून प्रसिद्ध झाला.
तात्पर्य- समोरच्याला मदत अशी करा की त्यामुळे तो स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करेल.  कोणीही इतरांच्या मदतीवर कायम अवलंबून राहणे योग्य नाही.
अनमोल बोधकथा, विद्याभारती प्रकाशन