हिंदू देह, तर हिंदुत्व त्याचा आत्मा

SV    10-Jun-2024
Total Views |
 
 आजकाल हिंदू आणि हिंदुत्व या विषयावर होणारी जोरदार चर्चा सतत कानावर येत असते. काही दिवसांपूर्वी एका मोठ्या राजकीय पक्षाच्या मोठ्या नेत्याने राजस्थानमधील सभेत हिंदू आणि हिंदुत्व या विषयी आपले ज्ञान पाजळले, ते ऐकून अनेक विद्वानांना आश्चर्याचा धक्काच बसला. कारण यापूर्वी अशी ज्ञानगर्भित व्याख्या त्यांनी कधीच  ऐकली नव्हती. आता असे वाटायला लागले आहे की, आपल्या प्रगतीशील देशात राजकारणाबरोबर भाषा, साहित्य, इतिहास, विज्ञान, अर्थशास्त्र अशा अनेक विषयांवर काहीही बोलण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त झाला आहे असे या राजकीय नेत्यांना वाटते. त्यामुळे या विषयांवर बोलायला कोणा तज्ञांची आवश्यकता आहे असे त्यांना वाटतच नाही. हे सारे विषय राजकारणाच्या स्वार्थ सागरात खोलवर बुडाले आहेत आणि राजकीय नेते सांगतील तेच अंतिम सत्य असणार आहे.
सध्या व्यक्ती आणि व्यक्तिमत्व या दोन वेगळ्या गोष्टी असल्याचे सांगितले जात आहे. हे दोन वेगळे शब्द आहेत हे नक्की पण अर्थाच्या दृष्टीने ते फार जवळ आहेत. व्यक्तिमत्व हा शब्दच मुळी व्यक्ती या शब्दापासून तयार होतो. आधी व्यक्ती आणि नंतर व्यक्तिमत्व. व्यक्तीची विशेषता त्याचे व्यक्तिमत्व आहे. हीच गोष्ट हिंदू आणि हिंदुत्वाची आहे. हिंदुत्वरहित हिंदू म्हणजे व्यक्तिमत्व नसलेली व्यक्ती ! समाजात काय किंवा सामाजिक जीवनात काय व्यक्तीला प्रतिष्ठा त्याच्या व्यक्तिमत्वामुळेच मिळते. एखादी व्यक्ती त्याच्या विशेष व्यक्तिमत्वामुळे महान ठरते, इतिहासात अमर होते. व्यक्तिमत्वहीन जीवन म्हणजे जीवजंतूप्रमाणे जीवन जगणे होय. व्यक्तीसाठी जसे व्यक्तिमत्व महत्वाचे तसे हिंदुंसाठी हिंदुत्व महत्वाचे आहे.
हिंदू आणि हिंदुत्व हे दोन शब्द आहेत, ‘हिंदू’ या शब्दापासून त्याने कोणत्या धर्मात जन्म घेतला याचा बोध होतो. ही संज्ञा हिंदू कुटुंबात जन्म घेताच प्राप्त होते आणि काही कारणास्तव त्याने त्याचा त्याग केला नाही तर ती मरेपर्यंत टिकते. हिंदुत्व ही मात्र भाववाचक संज्ञा आहे. हिंदू धर्माने स्वीकारलेल्या मान्यता, परंपरा, पूजापद्धती, रीतिरिवाज तत्सम अनेक पद्धतींबाबत श्रद्धा असल्याचा बोध हिंदुत्वामुळे होतो. हिंदुत्वात समस्त हिंदू समाजाबद्दलचा प्रेमाचा व आत्मीयतेचा भावबोध सामावलेला असतो. ज्याने हिंदू कुटुंबात जन्म घेतला परंतु हिंदुंचे उत्सव, सणवार अशा सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरांचा ज्याला अभिमान नाही; हिंदू महापुरुषांबद्दल ज्याला आदर नाही, हिंदुंची दुर्दशा पाहून ज्याला वेदना होत नाहीत, हिंदुंवर होणारे अत्याचार वाचून, ऐकून किंवा पाहून ज्याच्या मनात राग, संताप, क्रोध उत्पन्न होत नाही, तो हिंदुत्वहीन हिंदू काय कामाचा ?
अनेक महापुरुषांनी हिंदू धर्म, हिंदू समाज आणि हिंदू राष्ट्रासाठी आपले सर्वस्व समर्पित केले. या देशातील महानुभावांनी तयार केलेले उच्च तत्वज्ञान आणि जगाला आधारभूत ठरणारी संस्कृती हा हिंदुंनी निर्माण केलेला हिंदुत्वाचाच तर अविष्कार आहे. आज मात्र काही हिंदू व्यक्तिगत स्वार्थासाठी आणि स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी हिंदू आणि हिंदुत्वात भेद निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मतपेढीच्या लालसेपोटी अल्पसंख्यकांच्या दाढ्या कुरवाळण्याचे काम करीत आहे आणि त्यासाठी हिंदू हिताचा बळी देण्यासाठी ही मागेपुढे पहात नाहीत.
खरे म्हणजे, हिंदू हा देह असेल तर हिंदुत्व हा त्याचा आत्मा आहे. जसे आत्मा नसेल तर देहाला काही अर्थ नसतो, त्याचप्रमाणे हिंदुत्वरहित हिंदुंना काही अस्तित्वच नाही.  आत्माविहीन देह लवकरच सडतो आणि नष्ट होतो. देह जिवंत रहाण्यासाठी आत्म्याची आवश्यकता आहे. तसेच हिंदुंच्या अस्मितेसाठी हिंदुत्वाचा भावबोध जागृत रहाणे ही तितकेच आवश्यक आहे.
हिंदुंची अस्मिता नष्ट करण्यासाठी हिंदुत्व संपवण्याचा एक हजार वर्षांपासून प्रयत्न चालू आहे. हिंदुंचा बुद्धिभेद करण्यासाठी हिंदू आणि हिंदुत्व वेगळे करण्याचा प्रयत्न चालू झाला आहे. आता हिंदुंचा हिंदुत्वबोध सशक्त झाला नाही तर भारताची तीच अवस्था होईल जी शेकडो वर्षांपूर्वी पारशी आणि ज्यूंची झाली होती. आपली अस्मिता व सांस्कृतिक ओळख जिवंत ठेवायची असेल तर आम्ही केवळ जन्माने हिंदू असून भागणार नाही तर हृदयात हिंदुत्वाची आत्मज्योत प्रज्वलित होणे तितकेच आवश्यक आहे.    

         डॉ. कृष्णगोपाल मिश्र
प्रभासाक्षी २३.१२.२३