डाव्यांविषयी उजवं संशोधन

SV    30-May-2024
Total Views |
 
 राष्ट्रीय स्वयंसेवक संघ-जनसंघ भारतीय जनता पक्ष व डाव्या विचारसरणीवर आधारित राजकीय पक्ष ही आपल्या देशातील दोन राजकीय टोकं. प्रस्तुत लेखक भाजपचे नेते असल्याने 'डाव्यांचा खरा चेहरा' या पुस्तक लेखनात राजकीय अभिनवेश असेल, अशी समजूत होणं साहजिक आहे. मात्र माधव भांडारी यांनी हे लेखन, संशोधन तटस्थपणे केलं आहे. शिवाय, या माहिती-दाव्यांच्या पुष्ट्यर्थ दिलेले असंख्य संदर्भ, नोंदी, पुरावेही वस्तुनिष्ठ  आहेत.
भारतातील डावे पक्ष हे राष्ट्रीय भावनेशी कधीही एकरूप झाले नाहीत. एवढंच नव्हे, तर त्यांना या  देशाच्या राज्यघटनेविषयी कमालीचा तिरस्कार आहे व   भारताचे अनेक तुकडे करण हा त्यांचा घोषित कार्यक्रम आहे, हे  प्रमाण मांडताना त्यांनी भारतातील कम्युनिस्ट पक्षाच्या स्थापनेपासून जेएनयू मध्ये घडलेल्या 'टुकडे-टुकडे' घटनेपर्यंतचे असंख्य दाखले दिले आहेत.
फाळणीसाठी डाव्यांनी मुस्लिम लीगला सक्रीय सहकार्य केलं. एवढंच  नव्हे, तर १६ ऑगस्ट १९४६ रोजी कोलकत्यात सुऱ्हावर्दीने पुकारलेल्या प्रत्यक्ष कृती दिनी (डायरेक्ट अॅक्शन डे) व त्यानंतर चार दिवस झालेल्या हिंदुंच्या नृशंस संहारातही डावी मंडळी सामील होती, हा इतिहास भांडारी यांनी उद्धृत केला आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही त्यांनी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अवघ्या १५ दिवसांत निजामाला हाताशी धरून स्वतंत्र तेलंगणासाठी सशस्त्र उठाव केला, केंद्र सरकारने निजामावर कारवाई केली तेव्हा या मंडळींनी गदारोळ करत 'सरकार लोकशाहीचा गळा आवळत आहे', असा आरोप केला. १९६२ मध्ये  चीनने आक्रमण केलं तेव्हा तर डाव्यांनी कहर  करत उघड पाठींबा दिला. (तेव्हा तरुण असणारे मणिशंकर अय्यर केम्ब्रिज विद्यापीठात जखमी चिनी सैनिकांसाठी मदतनिधी जमा करत होते.)
अगदी लष्करातही गुप्त संघटना बांधण्याचा उद्योग डावे नेते करत होते. यानंतर १९७५ मध्ये आणीबाणीविरोधात सारा देश उभा ठाकला असताना डाव्यांनी मात्र इंदिरा गांधी यांना पाठींबा दिला. भांडारी यांनी या सर्व इतिहासाची तपशीलवार मांडणी केली आहे.
प. बंगाल, केरळ, त्रिपुरा येथे डाव्यांनी केलेल्या संघ भाजपच्या कार्यकर्त्यांच्या विच्छेदाचं वर्णन तर अंगावर शहारे आणणार आहे. 'आपण केरळमध्ये हिंसेचं बंगाली तंत्र (बंगालमधील कम्युनिस्ट आपल्या विरोधकांचं अपहरण करून त्यांना जमिनीत जिवंत गाडतात व वर मिठाचे थर देतात.) वापरायला हवं. त्यामुळे रक्तपात होत नाही व काही मागमूस ही उरत नाही....' केरळचे मुख्यमंत्री व माकपचे तत्कालीन सचिव पी. विजयन यांनी पाच मार्च २००८ रोजी पक्षाच्या बैठकीत हे विधान केलं होतं, असं त्यांचेच सहकारी, पक्षाचे माजी खासदार अब्दुल्ला कुट्टी यांनी पुढे उघड केलं. आजवर कथन न झालेली अशी अनेक तथ्यं या पुस्तकाच्या तेरा प्रकरणात वाचण्यास मिळतात.
                                                  म.टा. ३१/३/२४