मनुष्याची ओळख कर्मामुळे आहे कुळामुळे नाही

SV    28-May-2024
Total Views |
 
 अभयकुमारला जंगलात एक नुकतेच जन्मलेले अर्भक पडलेले दिसले. अभयकुमार ते अर्भक घेऊन घरी आला. त्याने त्याचे नाव 'जीवक' ठेवले, त्याचे पालनपोषण केले, त्याला यथायोग्य शिक्षण दिले. जीवक मोठा झाल्यावर त्याला समजले की, अभय कुमार आपला खरा पिता नाही, आपल्याला जन्मताच लोकापवादाच्या भीतीने जंगलात सोडून दिले होते. आपण कुलहीन आहोत हे लक्षात आल्यावर त्याचे मन खेदाने भरून गेले.  त्याने आपली ही खंत अभयकुमारजवळ व्यक्त केली. अभय कुमारने त्याला सांगितले की, ''तू या गोष्टी विसरून जा आणि तक्षशिला विद्यापीठाला जाऊन तेथे उच्च शिक्षण संपादन कर'' जीवक तक्षशिला येथील विद्यापीठात गेला. विद्यापीठाच्या आचार्यांनी जेव्हा जीवकाला कुळगोत्रासंबंधी प्रश्न विचारले तेव्हा त्याच्या स्पष्टवक्तेपणावर समाधान मानून आचार्यांनी त्याला विद्यापीठात प्रवेश दिला.
जीवकाने कठोर परिश्रम करून 'आयुर्वेदाचार्य'  ही पदवी प्राप्त केली. आचार्यांनी त्याला मगध येथे  जाऊन लोकांची सेवा करण्यास सांगितले. जीवक म्हणाला.''आचार्य ! मगध, राज्याची राजधानी आहे. तेथे सर्व कुलीन लोक निवास करतात. ते माझ्यासारख्या अकुलीन व्यक्तीकडून उपचार करून घेतील का? मला शंका येते की, कदाचित माझा अपमानही होऊ शकतो.''जीवकाच्या गुरूने उत्तर दिले, '' बाळ ! आजपासून तुझी योग्यता, क्षमता, प्रतिभा आणि ज्ञान हेच तुझे कुळ-गोत्र आहे. तू जेथे जाशील तेथे आपल्या गुणवत्तेचे सन्मानित होशील. मनुष्याची ओळख कर्मामुळे होते, कुळ आणि गोत्रामुळे नाही. सेवा हाच तुझा धर्म आहे.'' जीवकाच्या मनात उत्पन्न झालेला न्यूनगंड नाहीसा झाला. कालांतराने तो त्या काळातील विख्यात वैद्य म्हणून प्रसिद्ध पावला.                         राष्ट्रदेव , मार्च २०२४