स्वर्गाच्या दुसऱ्या दालनातील खदखद

SV    27-Apr-2024
Total Views |
 
 उठसूट संपूर्ण काश्मीरवर दावा करणाऱ्या, पाकिस्तानला आपल्या ताब्यात असलेल्या काश्मीरमध्ये (म्हणजे पाकव्याप्त  काश्मीर) ना विकास घडवता आला ना, तेथील जनतेला त्यांचे मूलभूत हक्क देता आले. पाकव्याप्त काश्मीर आणि गिलगिट बाल्टिस्तानमधील जनतेत                   आता पाकिस्तान सरकारच्या या भेदभाव करणाऱ्या धोरणाविरोधात तीव्र असंतोष निर्माण झाला असून, त्याचा भडका केव्हाही उडण्याची शक्यता आहे. 'कलम ३७०' हटविल्यावर, काश्मीरमध्ये होत असलेला विकास पाहून या असंतोषाच्या बॉम्बची वात शिलगावली गेली आहे.
'युनायटेड काश्मीर पीपल्स नॅशनल पार्टी' (युकेपीएनपी) या पाकव्याप्त काश्मीरमधील पक्षाचे नेते सरदार शौकत अली काश्मिरी यांनी जिनिव्हामध्ये नुकत्याच पार पडलेल्या, 'संयुक्त राष्ट्रां'च्या मानवाधिकार मंडळाच्या ५५ व्या सत्रात पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांच्या दुरवस्थेचे वर्णन केले. किंबहुना, पाकिस्तानच्या अन्याय्य कारभारामुळे पाकव्याप्त काश्मीर तसेच गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये मानवतावादी संकट उभे राहिले असल्याचे त्यांनी दाखवून दिले. या प्रदेशातील लोकांना पाकिस्तान सरकार दुय्यम दर्जाची वागणूक देत असते आणि त्यांच्या मानवाधिकारांची सर्रास गळचेपी करीत असते, असे काश्मिरी यांनी आपल्या भाषणात सांगितले, जी गोष्ट आजवर दबक्या आवाजात बोलली जात होती, ती काश्मिरी यांनी जगजाहीर केली.
'पाकिस्तानी लष्कर आणि सुरक्षा अधिकारी तेथील लोकांच्या जमिनी आणि तेथील पर्यटकांची रिसॉर्ट्स ताब्यात घेत असतात, त्यामुळे स्थानिकांच्या पोटावर पाय येतो," असे काश्मिरी यांनी सांगितले, काश्मिरी यांच्या या भाषणाने पाकिस्तानी लष्कराची मनमानी उघड झाली आहे.
पाकिस्तानातील नेते हे आजही सरंजामी मनोवृत्तीत जगत आहेत. पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील मुस्लिम हेच खरे पाकिस्तानी आणि पाकिस्तानच्या अन्य प्रदेशांतील मुस्लिमांनी पंजाबी मुस्लिमांचे वर्चस्व मान्य केले पाहिजे, ही तेथील नेतृत्वाची धारणा.  बांगलादेशाच्या निर्मितीला पंजावी पाकिस्तानी नेत्यांचा हाच दूषित आणि अन्याय्य दृष्टिकोन कारणीभूत होता. जेथे पश्चिम पाकिस्तानच्या अन्य प्रांतातील मुस्लिमांना ते बरोबरीचे मानीत नाहीत, तेथे ते पूर्व पाकिस्तानातील मुस्लिमांना आपल्या बरोबरीचे स्थान देणे शक्यच नव्हते. परिणामी, बांगलादेशाची निर्मिती झाली, तीच गोष्ट फाळणीनंतर भारतातून पाकिस्तानात गेलेल्या मुस्लिमांची. या मुस्लिमांना पाकिस्तानी सरकारने नेहमीच 'मुहाजिर' म्हणून हिणवले आणि दुय्यम दर्जाची वागणूक दिली. भारतीय मुस्लिम हे खरे मुस्लिमच नव्हेत, ते बाटलेले मुस्लिम असल्याचे सांगत, त्यांना आजही दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते.
भारतात राहून आणि येथील सर्व प्रगती आणि स्वातंत्र्याचा उपभोग घेऊन, पाकिस्तानची तळी उचलणारे, जे भारतीय नेते आहेत, ते ही गोष्ट भारतीय मुस्लिमांना कधीच सांगत नाहीत, भारतात राहून जगातील सर्व मुस्लिम हे बांधव आहेत आणि सर्व जण समान कसे आहेत, यावर त्याच्याकडून प्रवचने दिली जातात यापूर्वी अनेक बलुचिस्तानी नेत्यांनी आणि तेथील जनतेनेही पाकिस्तान सरकारच्या भेदभावी धोरणाचे पितळ उघड पाडले होते. आजही बलुचिस्तानातील नेते पाकिस्तानपासून मुक्त कसे व्हायचे, याच्या योजना आखत असतात, तेथे पाकिस्तानच्या वर्चस्वाविरोधात वारंवार होणारी बंडाळी पाकिस्तानी लष्कराला मोडून काढावी लागतात.
हा पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीर              भारतीय काश्मीरचाच भौगोलिक भाग आहे. भारतातील काश्मीरमध्ये केवळ भारतातूनच नव्हे, तर जगभरातून लाखो पर्यटक येत असतात. पण, हेच पर्यटक पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीरमध्ये का जात नाहीत? याचे कारण तेथे परदेशी पर्यटकांना जाण्यास पाकिस्तानने सक्त मनाई केली आहे. परदेशी पर्यटक तेथे गेले, तर पाकव्याप्त काश्मीरची खरी आणि हलाखीची परिस्थिती जगजाहीर होईल आणि आपला सारा दावाच फोल ठरेल, याची पाकिस्तानी सरकारला कल्पना आहे. आता परिस्थिती हाताबाहेर जात चालली असून, पाकव्याप्त काश्मीरमधील जनताच वारंवार उठाव, निदर्शने करू लागली आहे.
विशेषतः काश्मीरचे 'कलम ३७०' हटविल्यावर तेथे प्रगतीची आणि विकासाची जी गंगा वाहू लागली आहे, त्याची चित्रे टीव्हीच्या पडद्यावर पाहून, पाकव्याप्त काश्मीरमधील जनतेत आपल्याला मिळणाऱ्या दुजाभावाची आणि आपल्या मागासलेपणाची जाणीव वोचू लागली आहे. पाकव्याप्त काश्मिरीच नव्हे, तर पाकिस्तानातील जनतेनेही खुलेपणाने भारताच्या, त्यातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या जोरदार विकासाची मुक्तकंठाने स्तुती सुरू केली आहे. भारतातील अनेक हिंदी वृत्तवाहिन्यांनी पाकिस्तानी नागरिकांच्या प्रतिक्रिया येथे प्रसारित करण्यास प्रारंभ केला आहे. त्यातून पाकिस्तानी जनतेतही मोदींबद्दल तीव्र आकर्षण असल्याचे स्पष्ट होते. आपल्या देशातही एखादा मोदी हवा, असे मत अनेक पाकिस्तानी नागरिक व्यक्त करताना दिसतात. भारतीय अर्थव्यवस्था करीत असलेल्या वेगवान विकास आणि प्रगतीने पाकिस्तानी पत्रकार, बुद्धिजीवी आणि सामान्य नागरिक भारावून गेले आहेत.
काश्मीर (भारत व पाकिस्तानकडील दोन्ही) हा पृथ्वीवरील स्वर्ग मानला जातो. मात्र, पाकिस्तानने पार्टिशन टाकून, स्वर्गात दुसरी खोली निर्माण केली आहे पण, ही खोली तेथील स्थानिक जनतेसाठी कोठडी बनली आहे.

मु.त.भा.१९/३/२४