क्षमाशीलता हाच खरा धर्म

SV    20-Apr-2024
Total Views |
 
वाराणसीच्या गंगा नदीचा रमणीय घाट. सकाळची वेळ. संत वल्लभदास यांना नदी ओलांडून पलीकडच्या काठावर जायचे होते. सकाळीच शुचिर्भूत होऊन पूजापाठ करून प्रसन्न चित्ताने ते जायला निघाले होते. कपाळावर गंध आणि अंगावर भगवी वस्त्रे असा वेष त्यांनी धारण केला होता. विद्याभ्यासाचे तेज त्यांच्या मुखावर झळकत होते. ते एका नावेत बसले. त्यात काही तरुण मुलंही बसली. नावाड्याने नाव वल्हवत न्यायला सुरुवात केली. ती तरुण मुलं सुरुवातीला आपसात बोलत होती. पुढे त्यांनी वल्लभदासांकडे मोर्चा वळवला. ते त्यांच्या वस्त्राची चेष्टा करू लागले. नंतर कपाळावरील गंधाची चेष्टा केली. वल्लभदास अजिबात विचलित झाले नाहीत.
जेव्हा भक्त प्रतिकार करीत नाही तेव्हा भक्ताच्या मदतीला भगवंत धावून येतो त्यानुसार भगवंत कानात त्यांना हळूच म्हणाला, “तू काही प्रत्युत्तर का देत नाहीस?” त्यावर ते म्हणाले, “मुलं लहान आहेत. आपलं वागणं चुकीचं आहे हे त्यांना कळत नाहीये.” भगवंत त्यांना म्हणाला, “थांब, मीच त्यांना शिक्षा करतो म्हणजे मग माझा आपोआपच धावा करतील.” नाव पाण्यात कलंडू लागली. तेव्हा वल्लभदासांनी भगवंताला जे सांगितले ते असे, “प्रभू, ही नाव उलटून टाकण्याऐवजी तू त्यांची जीवननौका  पालटून टाक.  त्यांना बुडवण्याऐवजी जगात तरता येईल अशी चांगली  बुद्धी दे. त्यांचा विकास झाला की ते पुन्हा  कोणाशी असं वागणार नाहीत.” भगवंत हे ऐकून वल्लभदासांवर आणखी प्रसन्न झाले.
तात्पर्य- जे आपल्याला त्रास देतात त्यांचेही भले चिंतणारे हे खरे अध्यात्मिक- देवाचे भक्त. राग-लोभाला त्यांनी जिंकले आहे; त्यापुढचा विचार ते करतात.