गुलाब शेतीतून अर्थार्जन

SV    19-Apr-2024
Total Views |
 
 हर्षदा सोनार यांनी संगणकीय शाखेतून पदविका प्राप्त केली. त्यानंतर त्या एका कंपनीत नोकरीस रुजू झाल्या. सुव्यवस्थित जीवन सुरू असताना स्वतःची वेगळी ओळख तयार करायची अशी इच्छा मनात होती. शेतीत उतरावे असे वाटू लागले. अखेर मनाशी खूणगाठ बांधून नोकरी सोडून पूर्णवेळ गुलाब शेतीचे आव्हान पेलण्यासाठी हर्षदा सिद्ध झाल्या.
हर्षदा यांनी तळेगाव येथील पॉलिहाउस प्रशिक्षण संस्था गाठली. तेथे माहिती घेऊन आठ दिवसांचा 'बेसिक' अभ्यासक्रमही पूर्ण केला. इंटरनेट, यू-ट्युबवरून काही माहिती घेतली. एवढ्या ज्ञानाच्या तसेच आत्मविश्वासाच्या भांडवलावर २०१६ मध्ये पुण्यापासून काही किलोमीटरवरील शिक्रापूर येथे २० गुंठे क्षेत्रावरील पॉलिहाउस भाडेतत्त्वावर घेतले.
सुरुवातीची खडतर वाटचाल
पॉलिहाउसमधील सुरुवातीची काही वर्षे अत्यंत खडतर गेली. पहाटे पाच वाजता उठायचे, घरची आवराआवर, स्वयंपाक करायचा. मग पुण्याहून शिक्रापूरसाठी बसमार्गे पाबळ फाटा गाठायचा. तेथे ठेवलेल्या दुचाकीवरून साडेसात किलोमीटर अंतर कापून शेताच्या ठिकाणी यायचे. मशागतीपासून ते रोपे लावणे, फवारणी, खते देणे, फुलांची काढणी, काढणीपश्चात विक्री नियोजन, माल गुलटेकडी येथे स्थानिक वाहनातून पाठवणे अशी सर्व कामे हर्षदा शिकल्या शिक्रापूर येथील ही शेती कोरोना संकटामुळे थांबवावी लागली. मग खेड शिवापूर येथे एक एकर क्षेत्रावरील पॉलिहाउसमध्ये ही गुलाब शेती सुरू आहे. सर्व आव्हानांवर मात करत हर्षदा या शेतीत येथे एक एकर क्षेत्रावरील पॉलिहाउसमध्ये ही गुलाब शेती सुरू आहे. सर्व आव्हानांवर मात करत हर्षदा या शेतीत चांगल्या स्थिरावल्या आहेत.
...अशी आहे गुलाबशेती
एक एकरात डच गुलाब जातीच्या सुमारे २७ हजार रोपांचे व्यवस्थापन होते. एप्रिल-मे महिन्यांत कडक ऊन असते. अशा वेळी तापमान नियंत्रित राहावे यासाठी पडदे लावून अथवा सकाळी लवकर 'बेड'वर सिंचन करून गारवा तयार केला जातो. वर्षभरातील काही महिने वा कालावधी उत्पादन थंडावते. मात्र एकूण सरासरी पाहिल्यास महिन्याला सव्वा लाखांपर्यंत फुलांचे उत्पादन मिळते.
गुलटेकडी येथे व्यापारी निश्चित केला आहे.त्यालाच फुलांचा पुरवठा होतो.. एक एकर पॉलिहाउसचे मासिक भाडेशुल्क ३० हजार रुपये आहे. तर कामगारांचे वेतन, निविष्ठा आदी सर्व मिळून महिन्याला ८० हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. मात्र सुनियोजन व व्यवस्थापनातून महिन्याला समाधानकारक नफा मिळविण्यापर्यंत हर्षदा यांनी यश मिळवले आहे. सणासुदीला तसेच 'व्हॅलेंटाइन डे'च्या काळात उत्पन्नात वृद्धी होते.इच्छाशक्ती, कष्ट करण्याची तयारी व चिकाटी असेल तर तर महिलांपासून कोणतेही यश दूरचे नाही हाच संदेश हर्षदा यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केला आहे.
अॅग्रोवन ८/३/२४