स्वत:चा बालविवाह रोखला, शिक्षण घेऊन शासकीय नोकरी, १६ बालविवाह रोखले

SV    16-Apr-2024
Total Views |
 
 “दहावीनंतरही मला पुढे शिकायचे आहे", असे सांगत वयाच्या १४ व्या वर्षी होणाऱ्या स्वत:च्या बालविवाहास ठामपणे विरोध करण्याचे धैर्य भारती गेजगे या कन्येने १५ वर्षांपूर्वी दाखवले. नंतर शिक्षण पूर्ण करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन शासकीय सेवेत 'बालविकास प्रकल्प अधिकारी' म्हणून ती रुजू झाली. जीवावर उदार होऊन आजवर तिने १६ बालविवाह थांबवले आहेत.
मूळच्या सोलापूर जिल्ह्यातील होलार या अनुसूचित जाती जमातीतील भारती गेजगे यांचे आईवडील मजुरी करायचे. मोलमजुरीसाठी कुटुंब नाशिकजवळ एका गावात स्थलांतरित झाले. २००७ साली दहावीत असताना भरतीचा विवाह नातलगांनी ठरवला.मात्र आईच्या मदतीने तिने स्वत:चा बालविवाह रोखला. ठामपणे शिक्षण सुरु ठेवून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली आणि जालना जिल्ह्यात अंबड इथे बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणून त्या रूजू झाल्या. २०२१ पासून त्या नाशिक जवळील त्र्यंबकेश्वर इथे कार्यरत आहेत. बालविवाह रोखताना  वर-वधू दोन्हीकडील मंडळींचा विरोध, प्रसंगी अंगावर धावून जाण्यासारखे प्रकार घडतात. अनेक वेळा स्वत: एकटीने तर प्रसंगी पोलिसांची मदत घेऊन त्यांनी आतापर्यंत १६ बालविवाह रोखले आहेत.
"बालविवाह रोखल्याने मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध होते. अशा मुलींचे भविष्यकालीन नुकसान रोखल्याचे समाधान आहे. बालविवाह रोखण्याचे काम मी अव्याहत सुरु ठेवणार आहे." असे भारती गेजगे म्हणाल्या. त्यांना वाटचालीसाठी शुभेच्छा!
लोकमत ८/३/२४