योग्यतेमुळे सन्मान हवा

SV    09-Sep-2023
Total Views |
 
 लाल बहादूर शास्त्रीजी पंतप्रधान असताना घडलेला प्रसंग.! त्यांचा मुलगा अनिलने १२ वी ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमध्ये प्रवेशासाठी अर्ज भरला. अर्जात वडिलांचे नाव एल.बी.शास्त्री आणि पत्ता १०, जनपथ लिहिला होता. सर्व विद्यार्थांबरोबर त्याचाही अर्ज मुलाखत समितीकडे गेला. थोड्या वेळाने समितीचे अध्यक्ष मि.रॉबर्ट बाहेर आले आणि अनिलला त्यांनी विचारले, “आपण १० जनपथ मध्ये कसे राहता? ते तर पंतप्रधानांचे निवासस्थान आहे.’’ त्यावर अनिल म्हणाला, ‘सर, मी पंतप्रधान शास्त्रींचा मुलगा अनिल आहे.” हे ऐकून मि. रॉबर्ट लगेच त्याला आत घेऊन गेले. त्याचे विशेष आदरातिथ्य केले.
संध्याकाळी जेव्हा शास्त्रीजी कार्यालयातून घरी आले तेव्हा अनिल त्यांना उत्साहाने म्हणाला, “बाबूजी, आज कॉलेजमध्ये माझ्याबाबतीत  विशेष गोष्टी घडल्या. पहिली गोष्ट म्हणजे मी आपला मुलगा आहे हे कोणालाही माहित नव्हते; त्यामुळे सामान्य विद्यार्थ्याप्रमाणे माझ्याशी व्यवहार केला गेला. पण, अर्जावरील घराचा पत्ता पाहून समितीच्या एका सदस्यास समजले की मी आपला मुलगा आहे,  तेव्हा त्यांनी माझे विशेष आदरातिथ्य केले.” हे ऐकून  शास्त्रीजी त्याला म्हणाले, “ हे तू चांगले केलेस की सामान्य विद्यार्थ्याप्रमाणे अर्ज लिहून दिला आणि आत बोलावण्याची वाट पाहण्यासाठी रांगेत थांबलास. पण दुसरी गोष्ट मात्र मला अनुचित वाटली.”
अनिलने विचारले, “ बाबूजी, असे का?” तेव्हा शास्त्रीजी त्याला म्हणाले, “जेव्हा कॉलेजमध्ये समजले की तू पंतप्रधानांचा मुलगा आहे तेव्हा तुझे विशेष आदरातिथ्य केले गेले. व्यक्तीला आपल्या पद-प्रतिष्ठेमुळे किंवा प्रभावामुळे नव्हे; तर योग्यतेमुळेच आदर मिळायला हवा.”
                                                            
   पांचजन्य १८.६.२३