लोकवर्गणीतून खरेदी केली स्टीलची भांडी आणि प्लॅस्टिक वापरणे बंद केले

SV    08-Sep-2023
Total Views |
 
 राजनांदगांव या जिल्हा स्थानापासून १५ किलोमीटर दूर असलेले गांव धामनसरा. या गावाने दोन वर्षांपूर्वी प्लॅस्टिकवर बंदी घालण्याचा निर्णय मूर्त  स्वरूपात आणला. या गावाने प्लॅस्टिकचे ग्लास, प्लॅस्टिकच्या पत्रावळी  आणि पॉलीथिनवर बंदी घातली आहे. तेथील जिल्हा परिषदेचे सदस्य रोशनी वैष्णव म्हणाले की, प्लॅस्टिकच्या वस्तूंमुळे गावातील जनावरांना इजा होते आणि पर्यावरणही दूषित होते. म्हणून दोन वर्षांपूर्वीच प्लॅस्टिकवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता.
धामनसरा गावात लग्नापासून दहाव्याच्या जेवणापर्यंत प्लॅस्टिक वापरावर बंदी आणली आहे. अशा वेळी भांड्यांचा उपयोग करता यावा म्हणून गावकऱ्यांनी पंचायतीच्या मदतीने वर्गणी गोळा करून स्टीलची भांडी, ताटे, ग्लास, वाट्या, चमचे खरेदी केले. कोणाच्या घरी मोठ्या संख्येने भोजनाचा कार्यक्रम असेल तर गावातील लोकांना विनामूल्य अशी भांडी वापरण्यासाठी दिली जातात. त्याचा वापर झाल्यानंतर ती स्टीलची भांडी व्यवस्थित चांगल्या प्रकारे स्वच्छ करुन परत घेतली जातात.  गावकऱ्यांनी सांगितले की, जेव्हा गावात प्लॅस्टिक बंदी करायचे ठरले तेव्हा गावातील तरुण व वयस्कर मंडळी एकत्र आली आणि त्यांनी बैठक घेतली. त्यात प्लॅस्टिकच्या वापरावर चर्चा झाली व सर्वांच्या सहमतीने बंदी घालण्याचा निर्णय झाला. त्याच वेळी हेही ठरले की, मोठ्या संख्येने कोणाकडे गावात कार्यक्रम ठरला तर त्याची अडचण होऊ नये म्हणून ग्राम पंचायतीने स्टीलची भांडी खरेदी करावीत व त्याला निःशुल्क द्यावीत.  
           धामनसरा गावातील गावकरी आता आसपासच्या गावातही पर्यावरण जागृती करीत आहेत; ज्यामुळे प्लॅस्टिकचा वापर बंद होईल. आजूबाजूच्या गावातील लोकही धामनसरा गावातील लोकांकडून प्रेरणा घेऊन प्लॅस्टिक वापरावर बंदी घालण्याचा विचार करू लागले आहेत. असे झाले तर धामनसरा गाव, देशातील अन्य गावांसाठी एक मोठे उदाहरण ठरेल.  
  NEWS18 हिंदी १९.६.२३