पुणे मेट्रोची धुरा दोघी तरुणींनी लीलया पेलली आहे. एक जण मेट्रोचे (रेल्वे) सारथ्य करते, तर दुसरी स्थानकाच्या कामकाजावर नियंत्रण ठेवते. मेट्रोमध्ये काम करत असल्याचा सार्थ अभिमान असून, नवी ओळख मिळाली, याचा मनस्वी आनंद आहे, असे त्या दोघींनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले. मूळची साताऱ्याची असलेली अपूर्वा अलाटकर ही पुणे मेट्रोची पहिली महिला चालक, तर पहिली महिला स्थानक नियंत्रक होण्याचा मान मूळच्या अकोल्याच्या गीतांजली थोरातला जातो.
अपूर्वाने सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतनमधून 'मेकॅनिकल' विभागातून डिप्लोमा केला, तर 'बीई' चे शिक्षण साताऱ्यातच घेतले. रेल्वे चालविण्याचे तिचे स्वप्न हिरमुसून मागे फिरले. मात्र अपूर्वा नाउमेद झाली नाही. स्वप्नांचा 'ट्रॅक' तिने सोडला नाही. अपूर्वा म्हणाली, ''२०१९ मध्ये पुणे मेट्रोची जाहिरात नजरेस पडली आणि चालक होण्याचे स्वप्न पुन्हा खुणावू लागले. रेल्वे नाही तर मेट्रो चालवू, असा विचार केला. परीक्षा दिली आणि तिन्ही टप्प्यांवर यश मिळाले, २०२२ मध्ये प्रशिक्षण सुरु झाले. दोन महिन्यांच्या काळात रोज ८ तास प्रशिक्षण व्हायचे. यात मेट्रो चालविण्यापासून ते आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांच्या सुरक्षेसाठी काय केले पाहिजे आदींचा समावेश होता. प्रशिक्षण झाल्यानंतर प्रत्यक्षात प्रवाशांना घेऊन मेट्रो चालविण्यास सुरुवात केली. तेव्हा खूप आनंद झाला. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखविला तेव्हा रुबी हॉल स्थानकावरून वनाजच्या दिशेने जाणाऱ्या मेट्रोचे सारथ्य केले. हा आयुष्यातला सोनेरी क्षण होता.''
गीतांजलीने इलेक्ट्रीकल इंजिनिरिंगची पदवी घेतली आहे. अडीच वर्षे 'आयटी' मध्ये काम केले; मात्र तिथे मन रमले नाही. ती नोकरी सोडून फेब्रुवारी २०२३ मध्ये पुणे मेट्रोत ती दाखल झाली. चालक व स्थानक नियंत्रक अशा दोन्ही पातळ्यांवर जबाबदारीचे प्रशिक्षण घेतले. दोन्ही पदांची कामे व जबाबदाऱ्या वेगळ्या आहेत. मात्र दोन्ही कामे गीतांजली उत्तम प्रकारे करते. ती म्हणाली, ''स्थानक नियंत्रक म्हणून काम करताना पूर्ण स्थानकाची जबाबदारी असते. यात प्रवासी सुविधा, त्यांची सुरक्षा, स्थानकावरचे कार्य आदी महत्त्वपूर्ण कामे करावी लागतात. हे आव्हानात्मक असले तरी याचा आनंद वाटत आहे.''
सकाळ ३.८.२३