पालघर हा निसर्गाने संपन्न, चिकूचे माहेरघर व अन्य फळफळावळे - भाजीपाला यांच्यासाठी प्रसिध्द असलेला जिल्हा आहे. येथून सुमारे १० किलोमीटर अंतरावर वडराई येथे मुख्य रस्त्यापासून थोडे आत गेले की निधी व निखिल या गावड दांपत्यांची १४ एकरात समुद्रकिनाऱ्यापासून जवळ वसलेली समृध्द बाग ( वाडी) दृष्टीस पडते. त्यांनी कृषी पर्यटन केंद्रही विकसित केले आहे.
सध्या शेती व पर्यटन केंद्राची सर्व जबाबदारी निधीच पाहतात. त्या मूळच्या नाशिकच्या. त्यांचे पदवीपर्यंत शिक्षण झाले आहे. मुंबई हे त्यांचे सासर आहे. वडराई येथील सासरची ही बाग त्यांनी चिकाटीने व मेहनतीने सांभाळली, मोठी केली. पतीचीही त्यांना समर्थ साथ असते. या बागेत एक हजार नारळ, ४०० सुपारी, ७० हून अधिक आंब्याची झाडे आहेत.
चिकूची २० तर काही फणसाची झाडे आहेत. जास्वंदीचे पिवळा, जांभळा, लाल असे २५ हून अधिक प्रकार आहेत. रिठा, कडुनिंब, बांबूचे प्रकार, रूद्राक्ष, चाफा, बकुळीसारख्या वनस्पती आहेत. सफेद वेलची, लाल केळी, भूर केळी (गोड) व भाजीची केळीही बागेत आहेत. पपईची २० ते २५ झाडे आहेत.
बागेतील व्यवस्थापन : १४ एकर बागेची निगा राखणे, पाणी देणे आणि समुद्राकाठी जमीन असल्याने गोडे पाणी उपलब्ध करणे आव्हान होते. बागेला आधी पाटाने पाणी दिले जायचे. पण कमी मनुष्यबळात काम करण्यासाठी स्प्रिंकलर बसविले. तीन विहिरी खणल्या.
त्यामुळे गोड्या पाण्याचा प्रश्न मिटला. या विहिरींतील पाणी केवळ बागेसाठीच वापरले जात नाही तर यात कोळंबी आणि अन्य मासे सोडून त्यांचे संगोपन व विक्रीही केली जाते. चार ते पाच गायी- बैल असे पशुधन असून शेण आणि गोमूत्रापासून तयार केलेले खत बागेला वापरले जाते.
कृषी पर्यटनात रूपांतर : आपली बाग समुद्रकिनारी असल्याची पुरेपूर नामी संधी शोधून बागेचे रूपांतर गावड दाम्पत्याने कृषी पर्यटन केंद्रात केले आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे त्यांचे केंद्र नोंदणीकृत आहे. पर्यटकांसाठी नैसर्गिक वातावरणात पाच खोल्या तयार केल्या आहेत. त्या समुद्रकिनारी असल्याने अथांग समुद्राच्या उधाणलेल्या लाटा अंगावर घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात येथे पर्यटक येतात. विशेषतः शनिवारी, रविवारी गर्दी जास्त असते.
शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सहली देखील येथे येतात. पर्यटकांना घरगुती जेवण दिले जाते. मसाले, लोणचे, तूपही घरचेच असते. शेतातील भाजीपाला जेवणासाठी वापरला जातो. मासे खाण्याची आवड असणाऱ्यांसाठी विहिरीतील मासे काढून पदार्थ तयार केला जातो.
नैसर्गिक साबण- तेल निर्मिती : बागेतील विविध औषधी वनस्पतींचा वापर करून निधी यांनी घरच्या घरी नैसर्गिक साबण आणि तेल उत्पादने तयार केली आहेत.
नारळाच्या करवंटीपासूनही चारकोल साबण तयार केला आहे. आयुर्वेदिक पध्दतीने तयार केलेल्या या साबणांना मुंबईसह अन्य ठिकाणांहून येणाऱ्या पर्यटकांची मागणी आहे. यातून गावड कुटुंबीय चांगले आर्थिक उत्पन्नही मिळवतात.
अॅग्रोवन १३.६.२३