देशविदेशातील भारतीय संस्कृतीची स्वस्तिचिन्हे

SV    11-Sep-2023
Total Views |
 
 दीपाली पाटवदकर यांनी तीन वर्षांपूर्वी Know  Pakistan नावाची  लेखमाला फेसबुकवर चालवली होती. या मालेत पाकिस्तानमधील हिंदू-जैन-बौध्द-शीख स्थानांचे फोटो व त्यांची माहिती दिली होती. त्याची ‘साप्ताहिक विवेक’ मध्ये लेखमाला करण्याचा प्रस्ताव आल्यावर जगात चहूबाजूच्या देशांमध्ये पसरलेल्या हिंदू संस्कृतीच्या खुणांविषयी लिहावे असा विचार लेखिकेच्या मनात आला. इंडॉलॉजीचा अभ्यास करताना प्राचीन काळी जगभर पसरलेल्या भारतीय संस्कृतीचा अभ्यास दीपालीताईंनी केला आणि तो संस्कृती अभ्यास 'साप्ताहिक विवेक’ मधूनमधून लेखमालेच्या रूपात वाचकांसमोर ठेवला. त्या लेखमालेचे हे संपादित स्वरूप.
प्राचीन काळापासून साधा-रणपणे तेराव्या शतकापर्यंत भारतीय संस्कृती जिथे जिथे पोचली; त्या भूभागाला ‘बृहत्तर भारत’ असे संबोधले गेले. त्या भूभागाचे दीपालीताईनी सात भाग केले आणि त्यांना  वायव्यशल्य, उत्तरकुरू, ईशान्यसूत्र, पूर्वमित्र, आग्नेयपुराण, दक्षिणद्वीप, पश्चिमगाथा अशी नावे दिली. त्या सात भागात  त्यांनी अंतर्भाव केला तो पाकिस्तान, अफगाणिस्तान, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, शिनजियांग, चीन, मंगोलिया, कोरिया, जपान, तिबेट, नेपाळ, बांगलादेश, म्यानमार, थायलंड, कंबोडिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया, अंदमान, निकोबार, श्रीलंका, लक्षद्वीप, मालदीव, मॉरिशस, इराण, इराक, इजिप्त, ग्रीस, रोम, युरोप, अमेरिका आणि आफ्रिकेचा.
या  सुमारे ३१ देशात वा द्वीपात आजही इतक्या वर्षानंतर आढळून येणाऱ्या भारतीय संस्कृतीच्या पाऊलखुणांचा वेध घेण्याचा प्रयत्न लेखिकेने केला आहे. त्यात खाद्य संस्कृती आहे, रांगोळी आहे, अंक मोजण्याची पध्दत, कालगणनेची पद्धत, शिल्प कोरण्याची पध्दत, स्थापत्य पध्दत, नृत्य-गायन-वादन, जीवनाचे तत्वज्ञान सांगणाऱ्या परंपरा या सर्वांचा समावेश आहे. त्याचे सचित्र पुरावे लेखिकेने जोडले आहेत.
भारतीय समाज जिथे गेला तिथे त्याने विधायक कामाच्या आणि सृजनशीलतेच्या पाऊलखुणा मागे ठेवल्या. त्या खुणा मांगल्याच्या आहेत, कल्याणकारी आहेत, त्यामुळेच त्या 'स्वस्तिचिन्ह' रुपात आहेत. भारताबाहेरील एकेक गाव व तिथे मिळणारी हिंदू संस्कृतीची चिन्हे, यावर एकेक लेख आकार घेऊ लागला. काही चिन्हें मूर्त होती - मंदिराचे अवशेष, शिलालेख. काही चिन्हें अमूर्त होती - भारतीय भाषा, यज्ञ परंपरा.
लेखिकेने खूप परिश्रमाने  व आवश्यक त्या सर्व संदर्भाचे यथोचित संकलन करून हे पुस्तक लिहिले असल्याचा प्रत्यय पानोपानी 'येतो. ‘भारतशास्त्र’ किंवा ‘इंडॉलॉजी’ सारख्या विषयात त्यांनी संपादन केलेली दृष्टी, त्यासाठीचा संशोधनाचा भरभक्कम पाया याचे मनोज्ञ  दर्शन त्यांच्या लिखाणातील प्रगल्भतेतून होते.
     लेखिकेची वाचक-स्नेही शैली, पुस्तकाची देखणी मांडणी, पुस्तकाच्या आशयाला साजेशी चित्रे-नकाशे, पुस्तकातील मजकुराची नेटकी रचना यामुळे हे पुस्तक वाचनीय झाले आहे.
२५२ पानाच्या या पुस्तकाचे मूल्य ३००/-रुपये मात्र आहे.

पुस्तक मिळण्याचे ठिकाण,  विवेकानंद केंद्र,मराठी प्रकाशन विभाग,  अश्विनी हाईटस्,२०७२/१६/७७ 'बी' सदाशिव पेठ, टिळक रस्ता, पुणे ३०