दागिने - सौंदर्यामागील शास्त्र

22 Aug 2023 10:36:22
 
 मागील भागात आपण एक शास्त्रीय कारण अर्धवट ठेवले होते ते या लेखात समजून घेऊ. मागील लेखात सांगितल्याप्रमाणे सोन्याचे दागिने कमरेच्या वरच्या अवयवांसाठी आणि चांदीचे दागिने कमरेच्या खालच्या अवयवांसाठी वापरले जातात. याचे कारण असे : सोने हा धातू उष्णता बाहेर टाकतो आणि चांदी हा धातू उष्णता शोषून  घेतो त्यामुळे ज्या अवयवांना चांदीचा स्पर्श होतो त्या  अवयवांमधली उष्णता शोषली जाते. स्त्री असो वा पुरुष, दोघांचेही पुनरुत्पादनाचे अवयव कमरेखाली असतात. या अवयवांचे तापमान कमी असणे आवश्यक असते. ते जास्त असेल तर स्त्री असो वा पुरुष यांची जननक्षमता कमी होते. पूर्वीच्या काळी खूप मुले असणे आवश्यक होते कारण अनेक मुले लहानपणी विविध कारणांनी मृत्युमुखी पडत. खूप मुले जन्माला घालायची असतील तर स्त्री पुरुष दोघांचीही प्रजनन क्षमता चांगली असली पाहिजे. त्यासाठी पुनरुत्पादनाच्या अवयवांचे तापमान कमी असले पाहिजे किंवा त्यांच्यामधील उष्णता शोषून घेण्याचा उपाय असला पाहिजे. त्यामुळे कमरे खालचे सर्व दागिने चांदीचे बनवले जाऊ लागले. याचे संतुलन राखण्यासाठी कमरेच्या वरचे दागिने सोन्याचे वापरले जाऊ लागले. पहा, आपल्या परंपरांमध्ये किती शास्त्रीय दृष्टिकोन होता ते ! सर्वसाधारणपणे स्त्रियांना किंवा स्त्रियांसाठी जास्त दागिने आहेत. तुलनेने पुरुष कमी दागिने वापरतात. यात हौसेचा किंवा दागिने घालून मिरवण्याचा भाग आहेच. या व्यतिरिक्त काही शास्त्रीय कारणे देखील आहेत. आपण एक उदाहरण बघू : भारतातील कुठल्याही प्रदेशातील स्त्रिया हातामध्ये खूप संख्येने बांगड्या वापरतात. त्यात काचेच्या आणि धातूच्या बांगड्या असतात. धातूमध्ये सुध्दा सोन्याच्या बांगड्या वापरल्या जातात. सर्वसाधारणपणे बांगड्या हाताचा पंजा आणि कोपर यांच्यामध्ये घातल्या जातात. पारंपरिक भारतीय स्त्रीच्या हाताची हालचाल खूप असते कणीक मळणे, पोळ्या लाटणे किंवा घसरे मारून कपडे धुणे या क्रियांमध्ये मनगट आणि कोपर यांच्यामधील हाताची पुढे मागे हालचाल सातत्याने होत असते. बांगड्या घातल्याने या हाताच्या भागामधील रक्तवाहिन्यांना मालिश होते. या भागातील स्नायू मोकळे राहतात, रक्तवाहिन्या मऊ राहतात. हाताच्या सततच्या हालचालींमुळे बांगड्या पुढे मागे होत राहतात आणि त्यांच्या मालिशमुळे हाताचे स्नायू किंवा हातातील रक्तवाहिन्या कडक होत नाहीत. याच कारणासाठी शारीरिक कष्ट करणाऱ्या पुरुषांच्या हातामध्ये देखील धातूचे जाड कडे घालण्याची प्रथा होती.
स्त्रियांचे काही दागिने व्यावहारिक उपयोगाचे होते. उदाहरणार्थ छल्ला. पूर्वीच्या स्त्रिया घरामध्ये जे कपडे वापरत त्यात घरातील कपाटाच्या किंवा तिजोरीच्या किल्ल्या ठेवण्यासाठी खिसे नसत. या किल्ल्या अडकवण्यासाठी छल्ल्याचा उपयोग होत असे. स्त्रियांच्या बोटांमधील सोन्याची अंगठी लहान मुलाला दुधातून सोने उगाळून देण्यासाठी चटकन उपयोगी पडत असे. अशा रीतीने नुसत्या दागिन्यांमध्ये देखील हौस , आरोग्य, व्यावहारिकता या सर्वांचा विचार केला गेला. मी या लेखात फक्त काही दागिन्यांचा उल्लेख केला आहे. उरलेल्या सर्व दागिन्यांचा अशाच रीतीने आपण शास्त्रीय किंवा व्यावहारिक दृष्टिकोनातून विचार करावा ही विनंती.
Powered By Sangraha 9.0