कापसाचे उत्पादन दुपटीवर नेणारे संशोधन

SV    19-Aug-2023
Total Views |
 
 कापूस हे पीक भारताने जगाला दिलेली मोलाची भेट आहे. कापूस म्हणजे वस्त्र. पूर्ण जगाच्या अंगावर वस्त्र घालण्याचे श्रेय केवळ आणि केवळ भारतालाच आहे. कापूस या पिकाने काही लाख वर्षांचा प्रवास केला आहे, तसे पुरावे आपल्याकडे आहेत.
२००२ मध्ये बी.टी. कापूस आला आणि शेतकरी भारावून गेला. सुरुवातीला उत्पादन विनाफवारणी १० ते १५ क्विंटलवर आले. बीज, फवारणी, रासायनिक खत यावर मोठा खर्च होतो. खर्च वजा जाता नाममात्र उत्पन्न राहते. त्यामुळे कापूस या पिकापासून शेतकरी दूर जात आहे. कापसाऐवजी पैशाचे पीक म्हणून सोयाबीनची निवड केलेली आहे. कापूस या पिकाकडे दुर्लक्ष हे आपल्या देशाला परवडणारे नाही.
मी मागची २० वर्षे बी.टी.कॉटनवर अभ्यास करतोय, या विषयावर चिंतनही खूप केले आहे. त्याचा परिणाम म्हणून एका मौलिक संशोधनापर्यंत पोचण्यात मला यश आले आहे.
माझ्या संशोधनामुळे कापसाचे उत्पादन आतापेक्षा दुप्पट होईल यात काही नवल नाही. अडीचपट देखील खात्रीने वाढू शकते. या संशोधनाला CICR ने शास्त्रीय संशोधन असल्याची मान्यता दिलेली आहे.
त्यामुळे आता कापसाचे उत्पादन घेणे देशासाठी तर चांगले आहेच पण शेतकऱ्याला मालामाल व्हायला मदत करणारे आहे. या संशोधनामुळे उत्पादनखर्च नेहमीपेक्षा कमी होतो आणि उत्पन्न नक्कीच दुप्पट होते.
बी.टी. कपाशीत झाडावर दोन प्रकारच्या फांद्या असतात. १.गळफांदी (मोनोपोडीया) आणि २.फळफांदी (सिमपोडीया). या दोन्ही फांद्यांची लक्षणे निरनिराळी आहेत.
गळफांद्या सुरुवातीलाच येतात; त्यांची संख्या तीन, क्वचित चार असू शकते. नंतर वर येतात त्या फळफांद्या. त्यांची संख्या झाडाच्या उंचीवर अवलंबून आहे. तरी १० ते १२ फळफांद्या असतात. या जमिनीला समांतर आडव्या वाढतात, झाडाच्या खोडाकडून आलेला अन्नरस पूर्णपणे फांदीवर असलेल्या बोंडाला देतात. या फांद्यांवरच्या बोंडांची संख्या आणि बोंडांचे वजन झाडाच्या खोडाकडून मिळणाऱ्या अन्नावर अवलंबून असते. गळफांदीमुळे कापसाचे पीक तोट्यात जाते हे सूक्ष्म चिंतनातून माझ्या लक्षात आले.
गळफांद्या झाडाबरोबर थोडेसा बाजूला सरळ वाढतात. झाडाच्या उंचीइतकीच उंची आणि खोडाची जाडीही तेवढीच. झाडांनी घेतलेल्या अन्नरसातला ७०% अन्नरस या तीन/चार फांद्या घेतात. उरलेला ३०% अन्नरस झाडावर असलेल्या १० ते १२ फळफांद्यांना मिळतो. हा अन्नरस अतिशय कमी; त्यामुळे फळफांद्यांची लांबी वाढत नाही. फांदीवर तीन ते चार बोंडं लागतात. त्यांना अन्नरस कमी मिळाल्यामुळे बोंडांचे वजन कमी भरते. बारकाईने केलेल्या अभ्यासातून असे लक्षात आले की कापूस या उत्पादनातला मोठा अडसर गळफांद्या हा आहे. उत्पादन खर्चातला ७०% खर्च गळफांद्यांमुळे होतो. त्या तीन गळफांद्या कापून टाकल्यावर काय फरक पडला?
गळफांद्या (मोनोपोडीया) कापल्यानंतर खोडाकडून येणारा अन्नरस पूर्णपणे फळफांद्यांच्या (सिम्पोडीया) वाट्याला गेला. त्यांची लांबी वाढली. एका फळफांदीवर ३,४ ऐवजी ८,९,१० बोंडं लागली; साधारणपणे प्रत्येकी ६ ग्रॅम वजनाची.
बोंडांचे वजन वाढवले की कापसाचे उत्पादन वाढते. बोंडांचे वजन ३ ग्रॅमवरुन ६ ग्रॅमवर नेले. ते आणखी कसे वाढवता येईल याचा शोध सुरु केला. कापसाचे झाड जितके वाढेल तितके शेतकरी वाढू देतो. म्हणजे झाड ५ ते ६ फूट उंचीचे होते. एका ठराविक उंचीनंतर खोडाचा आकार कमी होतो व बोंडाचे वजनही १ ते १.५ ग्रॅम होते. म्हणजे ही वाढ कामाची नाही. म्हणजे जिथून खोडाची जाडी कमी होते तिथेच झाडाची उंची रोखावी. असे केल्यावर अकारण वर जाणारा अन्नरस फळफांद्यांना मिळाला आणि बोंडांचे वजन आठ ग्रॅम झाले.
माझ्या तंत्राने प्रत्येक बोंडाचे वजन ८ ग्रॅम होते, अगदी आपण सरासरी ६ ग्रॅम धरले तरी एकरी १८ क्विंटल कापूस आरामात येतो. म्हणजे आजच्या तीनपट कापूस जास्त.  पंतप्रधानांची इच्छा सहज पूर्ण करणारे, शेतकऱ्याचे दैन्य दूर करणारे हे तंत्रज्ञान असून कापूस हे शेतकऱ्याचे पांढरे सोने आहे.  
श्रीरंग (दादा) लाड, संघटनमंत्री
भारतीय किसान संघ, महाराष्ट्र प्रदेश व गोवा प्रदेश