नशाखोरी इस्लाम धर्मात हराम (निषिध्द) आहे. मादक पदार्थांच्या कारभारात असणे हे पण हराम आहे. परंतु या कारभारात मुस्लिमच जास्त आहेत आणि मुस्लिम वस्त्यातच हा कारभार जोरात चालला आहे. काही दिवसांपूर्वी दक्षिण मुंबईच्या डोंगरी उपनगरात पोलिसांनी छापा मारून ३२ कोटी रुपयांचे मादक पदार्थ जप्त केले. आणि एक मुस्लिम महिला आणि चार मुस्लिम तरुणांना गिरफ्तार केले. यापूर्वी डोंगरीत एक मोठी मादक पदार्थांची फॅक्टरीच चालू असल्याचे उघडकीस आले. या फॅक्टरीत एक मादक गोळी, जी 'बटन' नावाने नशाखोरांच्या जगात ओळखली जाते, त्याचे राजरोस उत्पादन सुरु होते. तेथूनसुध्दा कोट्यवधी रुपयांचे मादक पदार्थ जप्त करण्यात आले. मुस्लिम वस्त्यातच हे धंदे का चालतात ही खरी समस्या आहे. पूर्वी काही मुस्लिम संघटनांनी मादक पदार्थांच्या धंद्याविरोधी मोहीम उघडली होती. या मोहिमेचा परिणाम म्हणजे गल्लीतले अनेक नशेखोर (गर्दुले) पकडले गेले आणि काही मादक पदार्थ विकणारे समाजकंटक पकडले गेले. पण मुस्लिम मोहल्ल्यात मादक पदार्थांचा पुरवठा करणारे मात्र सुरक्षित राहिले. खरे तर त्यांचा बंदोबस्त जरुरी होता. असे केले असते तर आज डोंगरीत मादक पदार्थांची फॅक्टरीच राजरोस कशी चालली असती ?
मादक पदार्थांच्या खरेदी विक्री पुरवठ्याच्या धंद्यात बेसुमार पैसा मिळतो. एक किलो 'हेरॉईनची' किंमत एक कोटी रुपये आहे. एवढा प्रचंड फायदा असल्यामुळे जीव धोक्यात घालूनसुध्दा तरुण या धंद्यात पडतात कारण यात रातोरात करोडपती बनता येते. यात जर पकडले गेले तर गँगमधील सहकारी जामीन मिळवून देतात. यातून सुटण्यासाठी सुध्दा भरपूर मदत करतात. त्यामुळे त्या तरुणांना आपल्या भविष्याची काळजी वाटत नाही. त्यामुळे या गैरमार्गात गेलेला तरुण सहसाबाहेर पडत नाही. या तरूणाजवळ भरपूर संपत्ती असल्यामुळे त्याची समाजात बेइज्जत होत नाही. आज सर्वत्रच संपत्तीला फार महत्त्व आले आहे. ती कशी मिळवली याचा समाज विचार करत नाही. ज्याच्याजवळ अपार संपत्ती आहे त्याला दुनिया सलाम करते. आज वाईट मार्गाने मिळवलेल्या संपत्तीला हराम मानले जात नाही याचे कारण समाजात सदसद्विवेक संपला आहे. त्यामुळे गैर काम करताना खंत वाटत नाही. त्याचा पश्चाताप होत नाही. उलट अशा कामाचा अभिमान वाटतो. अशा गैरमार्गातील लोक ईदच्या दिवशी दोन डझन (२४) बकरे कुर्बानीसाठी आणतात आणि लोकांना जेवण देतात. समाज यांची तारीफच करतो. मुस्लिम विचार करत नाहीत की अशी कुर्बानी अल्ला मान्य करतो का? सर्व मुस्लिम अशा मटणावर तुटून पडतात. यामुळे मादक पदार्थांच्या कारभारातील मुस्लिम तरुणांचा वाढता सहभाग अत्यंत चिंताजनक आहे. हा कारभार कसा थांबवणार ? या तरुणांना कसे समजावणार ? हा फार गहन प्रश्न आहे. कारण हे तरुण आपल्या घरात भरपूर पैसे देत असतात त्यामुळे घरातील सर्व पालकसुध्दा त्यांना सन्मानाने वागवतात. त्यांनी हे पैसे कोणत्या मार्गाने कमावले हा प्रश्न घरातील कोणीही विचारत नाही. जर बाहेर कोणी विचारले तर पालकच उत्तर देतात, 'काय करणार ? त्याने बाहेर काम मिळविण्यासाठी खूप धडपड केली. शेवटी बेकार घरी बसण्यापेक्षा, उपाशी राहण्यापेक्षा हे काम नाईलाजाने करत आहे.' मोहल्ल्यातील मशिदीचे इमामसुध्दा या मामल्यात चूप बसतात कारण त्यांचे हात पण गरम केले जातात. आज मुस्लिम समाजाची अशी परिस्थिती आहे. यात सुधारणा कशी होणार? तरुणांना या मार्गापासून कसे वाचवणार ?
हरामखोरीमुळे (अधर्माचा रस्ता) काय नुकसान होते हे धर्माचा रस्ता दाखवूनच कदाचित पटवता येईल, त्याचा या तरुणांवर काहीतरी परिणाम होईल. संपत्ती हाच सर्व समस्यांवर उपाय नाही. केवळ संपत्तीलाच सर्वश्रेष्ठ मानल्यामुळे कुटुंबात अनेक दुर्गुण शिरले आहेत. त्या दुर्गुणांनी घट्ट मुळे पकडली आहेत. त्यामुळे जीवनात असमाधान आणि अधर्माने ठाण मांडले आहे. या सर्वांचे कारण मुस्लिम समाज धर्मापासून दूर गेला आहे. हलाल-हरामचा विवेक संपला आहे. त्यामुळे अशा अनेक समस्या उभ्या राहिल्या आहे. मुस्लिम वस्त्यातून मादक पदार्थांचा कारभार कसा संपवणार? तरुणांना या धंद्यातून बाहेर कसे काढणार ? तरुणांना इस्लाममध्ये हा कारभार हराम आहे कसे पटवणार? या मार्गात न जाता त्यांनी उत्तम शिक्षण घ्यावे हे त्यांना कोण सांगणार? पण हे सर्व केल्याशिवाय समस्या सोडवता येणार नाही. यासाठी समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती आणि संघटनांनी पुढे येऊन या प्रश्नाला भिडले पाहिजे. आपली पुढची पिढी विनाशाकडे चाललेली आपण उघड्या डोळ्याने पहात आहोत. त्यासाठी कुटुंबांनी सुध्दा गरिबीत राहणे पत्करले पाहिजे आणि घरात येणारा हा हरामचा पैसा रोखला पाहिजे जोपर्यंत समाज ही हिंमत दाखवणार नाही तोपर्यंत ही समस्या सोडवता येणार नाही, परिस्थिती सुधारणार नाही. आज कोणाही तरुणावर विश्वास ठेवता येत नाही. तो नशाखोरी करत नाही, व्यसनाधीन नाही हे सांगण्याची हिंमत होत नाही. थोड्याच काळात हा तरुण पालकांच्याही हाताबाहेर जातो. प्रत्येक क्षण समाजाला रसातळाकडे नेत आहे. अत्यंत हिंमतीने आणि सर्व ताकदीने समाजाने ही अधोगती थांबवणे हाच एकमेव उपाय आहे. संघटितपणे ही मोहीम घरोघर चालवावी लागेल. घरोघरी जाऊन तरुणांचे कौन्सिलिंग करावे लागेल. आपला मुलगा काय करतो? याबाबत पालकांनी अत्यंत सावध राहिले पाहिजे. असे केले तरच पुढची पिढी वाचवता येईल. यासाठी सर्व मुस्लिम संघटना, मौलवी, विचारवंत यांनी व्यसनाधीनतेतून समाजाला, विशेषतः तरुणांना बाहेर काढण्यासाठी कंबर कसली पाहिजे. त्यामुळेच मादक पदार्थांच्या कारभारातून मुस्लिम वस्त्यांना बाहेर काढता येईल. तरूण पिढी नशाखोरीतून बाहेर काढण्याचा हाच एकमात्र रस्ता आहे.
फारूक अन्सारी, उर्दू टाईम्स २२.६.२३