छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात विराजमान आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात शिवजयंती-उत्सव, शिवराज्याभिषेकदिन यासारखे शिवाजी महाराजांच्या स्मृती जागृत करणारे दिवस आनंदाने साजरे केले जातात. एका व्याख्यानात याच विषयावर बोलताना प्रसिध्द लेखक प्रा. शेषराव मोरे म्हणाले होते की, ''शिवाजी महाराजांनी शेतीत सुधारणा केल्या, ते न्यायप्रिय होते, त्यांचे युध्दकौशल्य वाखाणण्यासारखे होते, त्यांनी राज्यकारभाराची घडी उत्कृष्ट बसवली होती, असे अनेक गुण महाराजांमध्ये होते; परंतु हे सर्व गुण महाराजांमध्ये होते म्हणून केवळ आपण शिवजयंती साजरी करीत नाही. तर त्यावेळी भारतात अनेक वर्षांपासून मुस्लिम सत्ताधीशांची राज्ये होती. तेथे शरियतच्या आधारावर राज्यकारभार चालत होता. ही व्यवस्था महाराजांनी मोडून काढली आणि या भूमीवर हिंदुंचे राज्य पुन्हा निर्माण केले, हिंदू साम्राज्याची स्थापना केली. म्हणून साडेतीनशे वर्षे झाली तरी मराठी माणूस अत्यंत उत्साहाने हिंदू साम्राज्य दिन साजरा करत असतो.''शिवाजी महाराज हे धर्मनिरपेक्ष होते, हे सिध्द करण्याचा स्वतःला धर्म-निरपेक्ष म्हणविणाऱ्या तथाकथित नेत्यांचा जोरदार प्रयत्न चालू आहे. पण स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवणाऱ्या या तथाकथित नेत्यांच्या दृष्टीने धर्मनिरपेक्षता म्हणजे हिंदुंची उपेक्षा करणे आणि मुस्लिमांचा पक्षपात करणे.
जे हिंदुंच्या हितासाठी धडपडतात, हिंदुंच्या हिताची भाषा बोलतात, त्यांना ही तथाकथित नेते मंडळी जातीयवादी ठरवून टाकतात. समाजातील त्यांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून त्यांना कोणी समर्थन देण्याचे धाडस करणार नाही. पण शिवाजी महाराजांचे स्थान महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात असल्यामुळे त्यांची प्रतिमा भ्रष्ट करणे या नेत्यांना शक्य नव्हते. म्हणून या नेत्यांनी शिवाजी महाराजांनाच आपल्या धर्मनिरपेक्षतेच्या चौकटीत बसवण्याचा प्रयत्न सुरु केला.
शिवाजी महाराजांना त्यांच्या धर्मनिरपेक्षतेच्या चौकटीत बसवायचे म्हणजे महाराजांचा खोटा इतिहास सांगणे क्रमप्राप्त होते. मग महाराजांनी कशा मशिदी बांधल्या, अनेक मशिदींना कशी इनामे दिली, महाराजांच्या सैन्यात एक लाख मुसलमान होते असा धादांत खोटा इतिहास सांगण्यास सुरुवात केली. अनेक वेळा व वारंवार तेच ते खोटे सांगत राहिले की लोकांच्या मनात भ्रम निर्माण होतो. तो भ्रम निर्माण करण्याचा या नेत्यांचा प्रयत्न आहे.
इतिहासाचे गाढे अभ्यासक, शिवचरित्रकार श्री. गजाननराव मेहेंदळे यांनी शिवचरित्रावरील आक्षेपांचे खंडन करणारे एक व्याख्यान पुण्यात दिले. या पुस्तकातील त्यांचा लेख म्हणजे लिखित स्वरूपातील ते व्याख्यानच आहे. तथाकथित नेते मंडळी स्वतःच्या स्वार्थासाठी किती खोटे बोलतात व शिवाजी महाराजांबद्दल कसा गैरसमज पसरवतात, हे या पुस्तकातून लक्षात येईल. पुस्तक वाचल्यावर वाचकांना शिवाजी महाराजांच्या इतिहासातील सत्यता समजेल आणि शिवाजी महाराज हे खरे हिंदूहित रक्षक होते याची खात्री पटेल; याच हेतूसाठी हे पुस्तक प्रकशित केले आहे.
या ३२ पानांच्या छोट्याशा पुस्तकाचे मूल्य रु. २०/- असून ते मिळण्याचे ठिकाण खालीलप्रमाणे
सांस्कृतिक वार्तापत्र, सी-१, शालिनी रेसिडेन्सी- गेट नं. २,
आयसीआयसीआय बँकेची इमारत, हिंगणे बुद्रुक,
कर्वेनगर, पुणे ४११०५२. दूरभाष (०२०)२४४३३२५१५ | ९६०४९९३७१५ -