होय , मी हिंदू आहे

SV    07-Nov-2023
Total Views |
 
 आपले घरदार, प्रांत, देश सोडून उच्च शिक्षणासाठी सर्वसामान्य घरातील एक तरुणी ब्रिटनमधील नामवंत ऑक्सफर्ड विद्यापीठात जाते. आपल्या आवडत्या विषयाचा अभ्यास करण्यासाठी बुद्धिमत्तेच्या जोरावर तिथे प्रवेश मिळवते. तिथे प्रतिष्ठेच्या विद्यार्थी प्रतिनिधी निवडणुकीस उभी राहते. ५४% मते मिळवून जिंकते. ही निवडणूक जिंकणारी पहिली हिंदू मुलगी ठरते आणि तिच्या दु:स्वप्नाला सुरुवात होते.
ही सत्यघटना आहे रश्मी सामंत या कर्नाटकातील उडुपी गावाच्या विद्यार्थिनीची. ऑक्सफर्ड विद्यापीठात ती निवडून आल्यानंतर डाव्या आणि हिंदुविरोधी शक्तींनी दुसऱ्याच दिवशीपासून सोशल मिडिया आणि अन्य माध्यमातून तिची बदनामी सुरु केली. हिंदू म्हणून तिला हिणवले गेले. वंशवादाचा बळी ठरवले गेले. अत्यंत कुटील रणनीतीद्वारे तिचे मानसिक खच्चीकरण कसे करता येईल असा प्रयत्न प्रत्येक व्यासपीठावरुन करण्यात आला. एका चीनी आणि फिजीच्या विद्यार्थिनीने सुरुवातीला तिच्याविरुध्द पोस्ट टाकली. तिच्या पाच वर्षांपूर्वीच्या फेसबुक पोस्ट व्हायरल करत ती हिंदू आहे आणि भारतात हिंदू समाज एका विशिष्ट समाजाविरुद्ध कसा सक्रीय असतो हे दाखवताना तिच्या आईवडिलांना त्यात ओढले. त्यांची ‘जय श्रीराम’ लिहिलेली पोस्ट व्हायरल करुन बाबरी मशीद पडल्याचा ते आनंद व्यक्त करताहेत असा आरोप केला. ती ऑक्सफर्डला असताना, कोणताही एफआयआर नसताना उडुपीत मध्यरात्री पोलीस तिच्या आईवडिलांची चौकशी करण्यासाठी गेले. तिचा आत्मविश्वास खच्ची करण्यासाठी इतके प्रयत्न केले गेले की अखेर तिने पाचव्या दिवशी राजीनामा दिला!
इकडे भारतात कॉंग्रेस पक्षाने त्यात भाग घेतला. ‘रश्मी ऑक्सफर्डमधली ड्रॉपआऊट आहे’ अशी विधाने केली. रश्मी म्हणते, “डाव्या विचारसरणीच्या लोकांचे मोठे जाळे आहे जे जगभरातल्या अनेक राष्ट्रांमधून चालवले जाते. हिंदूंच्या आस्था, श्रद्धा असलेल्या बाबींवर प्रहार करुन हिंदूंचे यश लपवून टाकायचे. मी पहिली हिंदू म्हणून ऑक्सफर्डमधून निवडून आले हे जगात पसरु नये म्हणून या लोकांनी मला जेरीस आणले.”
रश्मीने तिकडे हिंदू म्हणून तिच्याविरुद्ध वातावरण तापलेले असताना एकटीने खूप लढा दिला. अखेर ती भारतात परत आली. ऑनलाईन शिक्षण घेऊन तिने  तिचे  पुढचे शिक्षण पूर्ण केले आणि पदवी मिळवली.
‘अ हिंदू इन ऑक्सफर्ड’ हे पुस्तक तिने लिहिले असून त्याची पहिली आवृत्ती हातोहात विकली गेली. अॅमेझॉनवर १२ तासात ‘बेस्टसेलर’ म्हणून हे पुस्तक वाचकांच्या पसंतीस पडले. हिंदुविरोधी षडयंत्र माहिती व्हावे म्हणून हे पुस्तक सगळ्या भाषांमध्ये प्रसारित करणार आहेत.                                                
   मुं.त.भा.१०.९.२३