एका गावी राजा रामराव म्हणून एक जमीनदार राहत होते.त्यांनी गावात एक सुंदर वाडा बांधला होता. तो वाडा बघण्यासाठी गावोगावचे लोक यायचे. मोठ्या शहरातसुद्धा इतका देखणा वाडा बघायला मिळत नसे.
त्यांच्या शेतात पिकणारे धान्य ते स्वत: समोर उभे राहून कोठारात भरुन ठेवायचे. नोकरांना आणि गरीबांना धान्य देताना स्वत: काटेकोरपणे मोजून द्यायचे. नंतर कोठाराला कुलूप लावत असत. एकदा असेच तिघेजण वाडा बघण्यासाठी आले. त्यावेळी कोठारातून धान्य काढणे सुरु होते. काही दाणे जमिनीवर सांडले होते. जमीनदार राजा रामराव यांनी स्वत: ते दाणे वेचून कोठारातल्या धान्याच्या पोत्यात टाकले. ते पाहून आलेल्या लोकांपैकी एकाने चेष्टेच्या स्वरात विचारले, “राजासाहेब, तुम्ही धान्याचा एकेक दाणा असा वेचता आहात की ते जणू सोन्याचे मणी आहेत!” जमीनदार काहीही बोलले नाहीत.
त्या तिघांनाही राजासाहेबांनी जेवण्यासाठी थांबवून घेतले. चविष्ट अन्न समोर येईल असे वाटून जेवण्यासाठी ते तिघेही ताटासमोर येऊन बसले. मात्र त्यांना जेवण्यासाठी अन्नाऐवजी सोन्याचे मणी वाढण्यात आले.
राजासाहेब म्हणाले, “घ्या, पोटभर जेवा. धान्याच्या किमतीपेक्षा जास्त महाग सोने वाढले आहे. हवं तेवढं मागून घ्या.” तेव्हा आपली चूक त्यांच्या लक्षात आली.
त्यांनी राजासाहेबांची माफी मागितली. मग त्यांना सुग्रास जेवण आग्रह करुन वाढण्यात आले. अन्नाची किंमत ओळखून ते आपल्या गावी परतले. तात्पर्य - अन्नाचा एकेक दाणा किमती आहे. आपणही त्याची किंमत ठेवावी. पोट भरण्यासाठी अन्नाशिवाय दुसरे काहीही चालत नाही.
- चांदोबा