रेल्वे मंडळाच्या पहिल्या महिला अध्यक्ष - जया वर्मा-सिन्हा

SV    16-Nov-2023
Total Views |
 
 जगात चौथ्या क्रमांकावर असलेल्या ‘भारतीय रेल्वे’च्या १८६ वर्षांच्या इतिहासात प्रथमच रेल्वे मंडळाच्या अध्यक्षपदी एका कर्तबगार महिला अधिकाऱ्याची नियुक्ती झाली आहे. जया वर्मा-सिन्हा त्यांचे नाव.
प्रयागराज इथे जन्मलेल्या जया यांनी विद्यापीठातून बी.एसस्सी आणि नंतर मानसशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले. १९८८ साली भारतीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत गुणवत्ता यादीत त्यांचे नाव वरच्या क्रमांकावर होते.  मात्र पोलीस अथवा महसूल विभागात कार्यालयीन कामकाजात रुजू होण्याचा सरधोपट मार्ग न निवडता त्यांनी रेल्वे वाहतूक विभागाची निवड केली. या विभागात पायाला भिंगरी लावून काम करावे लागते. इथला दिवस पहाटे चार वाजता सुरु होतो. अनेक विभागांशी समन्वय, सिग्नल यंत्रणेची तपासणी करण्यासाठी छोट्या इंजिनमधून प्रवास अशी जोखमीची आणि आव्हानात्मक कामे करावी लागतात. विभागीय अधीक्षक, विभागीय व्यवस्थापक अशा जबाबदाऱ्या जया यांनी पार पाडल्या. रेल्वेचे संगणकीकरण करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. रेल्वेतील उत्तर, पूर्व आणि दक्षिण-पूर्व विभागात त्यांनी  पदे भूषविली.
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयात रेल्वे सल्लागार असताना त्यांच्या प्रयत्नांनी  कोलकाता ते ढाका  ही ‘मैत्री एक्स्प्रेस’ सुरु झाली. त्यांनी अनेक महत्त्वाचे रेल्वे पूल उभारले. ओरिसातील बालासोर इथे जूनमध्ये तीन ट्रेन्सची धडक होऊन भीषण अपघात झाला तेव्हा जटील सिग्नल यंत्रणेची माहिती जया वर्मा-सिन्हा यांनी माध्यमांना सोप्या शब्दात उलगडून दाखवली होती. त्यावेळी हे नाव भारतीयांना माहिती झाले. याबाबतचे विशेष सादरीकरणही त्यांनी पंतप्रधान कार्यालयात केले होते.
रेल्वेची ‘फ्रेट ऑपरेशन इन्फर्मेशन सिस्टीम’ उभारण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. रेल्वेतील वहातूक, वाणिज्य, आयटी आणि दक्षता विभागातील कामांचा  त्यांना दांडगा अनुभव आहे. प्रधान वाहतूक व्यवस्थापकपद सांभाळणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. रांची इथे विद्युतीकरणाच्या प्रकल्पावरही त्यांची नेमणूक झाली होती. शालेय वयापासून हुशार विद्यार्थिनी असलेल्या जया वर्मा या अव्वल दर्जाच्या छायाचित्रकार आहेत. त्यांना संगीताचीही उत्कृष्ट जाण आहे. त्यांचे पती नीरज हे बिहारच्या नागरी पोलीस दलात महासंचालक असून मुलगी अवनिका दिल्लीत शिक्षण घेते. निवृत्तीच्या दोन महिने आधी एक वर्षाची मुदतवाढ मिळालेल्या जया वर्मा-सिन्हा नवीन जबाबदारीत आपली छाप नक्कीच उमटवतील. त्यांना शुभेच्छा!                    
    पुढारी १०.९.२३