मराठेशाहीची धारातीर्थे - खंड - १ : शिवस्वराज्य काल

SV    13-Jul-2022
Total Views |
 
 
 स्मरणरंजनात रमणे हा मनुष्य स्वभाव आहे. आपल्या प्रियजनांच्या आठवणीत तर आपण सहज रमतो. मात्र त्या आठवणी इतिहास घडवणाऱ्या व्यक्तींच्या असतील तर अंगावर रोमांच उभे राहतात. समाधी हे अशा आठवणीचं दृश्य रूप. महापुरुषांच्या समाधीचे दर्शन घेणे हा रोमांचकारक अनुभव असतो.
 
‘मराठेशाहीची धारातीर्थे -   खंड १ , शिवस्वराज्य काळ’ या नावाचे  हे पुस्तक वाचताना आपल्याला पानोपानी हा अनुभव येतो. लेखकाने म्हटल्याप्रमाणे मराठ्यांचे किल्ले ही मराठ्यांची तीर्थक्षेत्रे तर पराक्रमी मराठ्यांची समाधीस्थाने ही मराठ्यांची धारातीर्थे आहेत. अशा अप्रसिध्द समाधी स्थानांचा शोध आणि मागोवा घेऊन लेखकाने हे पुस्तक लिहिले आहे. मालोजीराजे भोसले यांच्यापासून ते औरंगजेबाच्या मृत्युपर्यंतचा काळ या पुस्तकात घेतला आहे.यात एकूण ३०० वीर पुरुषांची माहिती त्यांच्या पराक्रम गाथेसह आहे.
 
रायगडावरील छत्रपती शिवरायाच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर लेखक एका वेगळ्या विचाराने भारावला. स्वराज्य निर्मितीसाठी अनेक जणांचे हात लागले होते. सगळ्यांची नावे, पराक्रम याची नोंद असणे शक्य नाही. पण ज्यांची स्मृतीस्थळे आहेत ती शोधण्याचा ध्यास घेऊन लेखकाने जवळजवळ तीस वर्षे खूप प्रवास केला. छायाचित्रे काढली. गड किल्ले तर पाहिलेच, मंदिरे, शिल्पे, गढी, वाडे, घाट, पुष्करिणी अशा निरनिराळ्या स्वरुपात स्मारकांचा शोध घेतला.
 
मल्हारराव होळकर, खंडेराव दाभाडे,गायकवाड, गुजर, भोसले , घोरपडे ही नावे आपल्याला माहिती असलेली नावे. त्यांच्या समाधी स्थळांची माहिती यात आहेच पण  शिवाजीराव डूबल, सटवोजी डफळे, बाबूजी नाईक जोशी यासह अनेक  अप्रसिध्द वीरांची समाधी स्थाने आपल्याला इथे भेटतात.
 
पन्हाळगडाभोवती असलेल्या सिध्दी जौहरच्या वेढ्यातून सुटून अवघड अशा पावनखिंडीतून भर पावसात महाराज विशाळगडावर पोचले. त्यासाठी बाजीप्रभू प्राणपणाने कसे लढले हे आपण शालेय पुस्तकात वाचलेले असते. त्यांच्या समाधीला भेट देणाऱ्यांची संख्या मोठी आहे. सध्या त्याच तिथीला दरवर्षी तिथे पन्हाळगड ते विशाळगड असा ट्रेकही आयोजित केला जातो. पण या धाडसात शिवाजी काशीद या मावळ्याने शिवाजी महाराजांचे सोंग घेऊन शत्रू पक्षाला झुलवत ठेवले त्यामुळे तेव्हढा जास्त वेळ इकडे महाराजांना पुढे जाताना मिळाला हेही तितकेच महत्वाचे आहे. हे शिवाजी काशीद शत्रूला सापडल्यावर त्यांचे बिंग फुटले आणि त्यांना भाल्याने ठार मारण्यात आले. त्यांच्या समाधीविषयी आपल्याला विशेष माहिती नसते. त्याबद्दल या पुस्तकात माहिती मिळते.
 
शिवपूर्वकाळ, शिवकाळ, संभाजी महाराज काळ आणि राजाराम महाराज व ताराराणी काळ असे विभाग करून योध्यांची सविस्तर माहिती दिली आहे. समाधीस्थळ, शिक्के, नाणी इतर आयुधे यांचे रंगीत फोटो छापले आहेत.
 
लेखकाने वेळ, पैसे याचा विचार न करता सुमारे एक लाख किलोमीटर इतका प्रवास मोटारसायकल -वरून केला. पुस्तकाच्या या पहिल्या भागात ३०० पेक्षा जास्त वीरांची आणि समाधी स्थळांची माहिती समाविष्ट आहे.
 
शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं ते हजारो मावळ्यांच्या साथीने. त्यांचीही शौर्यगाथा तितकीच महत्त्वाची आहे. तो लपलेला इतिहास लोकांपर्यंत पोचवण्याचे मोठे काम लेखकाने केले आहे. इतिहास घडवणाऱ्या या अप्रसिध्द वीरांची माहिती वाचून आपल्या ज्ञानात मोठी भर घालण्याचे काम या पुस्तकाने अर्थातच लेखकाने केले आहे.
 
 मराठेशाहीची धारातीर्थे , खंड १ – शिवस्वराज्य काल. लेखक- प्रवीण भोसले,  शिवमुद्रा प्रकाशन, दत्तनगर, विश्रामबाग, सांगली, फोन- ०२३३-२३००८५३  पृष्ठसंख्या – ४५२, किंमत – ८४० रुपये

Regards-:
Sanskrutik Vartapatra
1360,Shukrawar Peth,
Behind Sarswati Mandir Sanstha,
Natubaug,Pune-411046
Maharashtra
Ph-:020-24432515
Mob-:9604993715